चंद्रपूर, दि.23 मार्च : कोरोना (कोविड-19) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध् ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे अनेक सामान्य आजाराचे रुग्ण सुद्धा रुग्णालयांमध्ये गर्दी करीत आहे. खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये अशा वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे तथापि तुलनेने अत्यावश्यक नसलेल्या आजाराच्या संदर्भात दूरध्वनीवरुन चौकशी करण्याचे आव्हान इंडियन मेडिकल असोसिएशनने केले आहे.
घाबरून न जाता रुग्णालयातील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी व सामान्य आजाराचे रुग्णांना दूरध्वनीवरूनच जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांनी आजाराचे निरसन करावे यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने पुढाकार घेतला आहे.
इंडियन मेडिकल कौन्सिल, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी रुग्णालयात अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व सामान्य आजाराच्या रुग्णांना दूरध्वनीवरच आजाराविषयी मार्गदर्शन व सल्ला जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांनी द्यावा या संदर्भात एक ठराव पारित केला आहे.
या ठरावामध्ये जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना व डॉक्टरांना मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली आहे. यामध्ये केवळ किरकोळ आजार, रुग्णाचा वैद्यकीय इतिहास ज्ञात असलेला नियमित पाठपुरावा, कोणती इंजेक्शन लिहून देता येणार नाही, कोरोना संदर्भात वैद्यकीय दृष्ट्या संशयीत प्रकरणासाठी कोणतीही प्रिस्क्रिप्शन नाही. या परिस्थितीतच ऑनलाइन सल्ला आणि सूचना देता येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे कार्यकारी सदस्य डॉ मंगेश गुलवाडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील सामान्य आजाराच्या रुग्णांनी दवाखान्यात न येता रुग्णालयांनी जारी केलेले संपर्क क्रमांकावर संपर्क करून आजारा संदर्भात निरसन करावे असे आवाहन, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.किरण देशपांडे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या