मुंबई: मुंबई आणि पुणे या Coronavirus च्या हॉटस्पॉटमधली रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजही यात मोठी वाढ झाली. पण त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी आली आहे मुंबईच्या अशाच एका हॉटस्पॉटमधून. मुंबईचा प्रभादेवी आणि वरळी हा सर्वात मोठा कोरोना हॉटस्पॉट ठरला आहे. तिथून सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल होत आहेत. यात वरळी कोळीवड्यातील 129 जणांना आज घरी पाठवण्यात आलं. या सगळ्यांवर गेले 14 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची ताजी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आणि 14 दिवसांचा क्वारंटाइन पीरिअड संपल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं.
मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील हॉस्पिटल मध्ये या सगळ्या कोरोनाग्रस्तांना ठेवलं होतं. त्यातल्या 129 जणांना घरी पाठवण्यात आलं. या सगळ्यांना विलगीकरणात ठेवलेलं होतं. आता त्यांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. यातले बहुतेक सगळे जण वरळी कोळीवड्यातील नागरिक आहेत. 14 दिवसांचा विलागीकरणाचा कालावधी संपल्यांनातर आज ही मंडळी आपल्या घरी परतली.
आतापर्यंत 250 हून अधिक झाले बरे
आजपर्यंत राज्यातून 259 COVID-19 रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 67701 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 5647 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी 50 जण करोना बाधित आढळले आहेत.
राज्यात आज कोरोनाच्या 350 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या 2684 झाली आहे. कोरोनाबाधित 259 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 2247 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 46,588 नमुन्यांपैकी 42808 जणांचे नमुने प्रयोगशाळेत निगेटिव्ह आले आहेत. तर 2684 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
0 टिप्पण्या