पुणे : कोरोनामुळे शहरातील विविध भागात बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी घरात बसण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे अनेक पुणेकरांकडून कानाडोळा केला जात आहे. त्यासाठी लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर विनाकारण, विनापास मोकाट फिरणार्यांसाठी पुणे पोलिसांनी एक ट्वीट केले आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये विनाकारण भटकंती करणार्यांसाठी पुणे पोलिसांनी एक खुली ऑफर दिली आहे. ’ज्यांना बाहेर जायचंय, त्यांनी खुशाल जा! कोणताही पास नाही, पण त्यासाठी आमची एकच आहे ती म्हणजे आधी 6 तास कोरोनाचा संसर्ग झालेल्या ’रेड झोन’मध्ये पोलिसांसोबत ड्युटी करून दाखवावी… बोला आहे मंजूर…” अशा आशयाचे ट्वीट पुणे पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून केले आहे. त्यामुळे नेटकर्यांनी पोलिसांच्या ट्वीटवर लाईकचा वर्षाव केला आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. विनाकारण भटकंती करणार्या नागरिकांना उठाबशा काढायला लावणे, त्यांच्याकडून व्यायाम करवून घेत शिक्षा दिली जात आहे. त्यामुळे या अनोख्या पुणे पोलिसांच्या ट्वीटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. काही दिवसांपुर्वीची चेन्नई पोलिसांनी मोकाट फिरणार्यांना डमी कोरोना रुग्णाची भीती दाखवली होती. तो चेन्नई पोलिसांचा अॅम्ब्युलन्सवाला व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी ही भन्नाट ऑफर भटकणार्यांसमोर ठेवली आहे. यावरुन सोशल मीडियावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
0 टिप्पण्या