लाॅकडाऊन खत्म होने के बाद फिर से आना...!



पालकमंत्र्यांनी झारखंड ला जाणाऱ्या मजुरांशी साधला भावनिक संवाद!

गडचांदूर येथून ही झारखंड साठी रवाना झाले नागरिक!
मिळालेल्या माहितीनुसार, गडचांदूर येथील 12 व कोरपना तालुक्यातील 4 असे 16 नागरिक आज गडचांदूर येथून झारखंड येथे बस ने रवाना झालेत. नागपूर वरून निघणाऱ्या श्रमिक रेल्वेने ते झारखंड येथे रवाना झाले.



चंद्रपूर,दि.13 मे : "लॉकडाऊन खत्म होने के बाद फिर से आना.. जहॉ, काम किया है वहॉ काम मिलेगा" अशा आश्वासक शब्दात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संवाद साधत झारखंडच्या नागरिकांना निरोप दिला. यावर महाराष्ट्र के भरोसे हमारी रोजीरोटी है... हम लोग आपका प्यार कैसे भुला देंगे...! असे भावपूर्ण उद्गार काढत जिल्ह्यातील झारखंडच्या मजुरांनी आज चंद्रपूर शहराचा निरोप घेतला. वेळात वेळ काढून ना. विजय वडेट्टीवार यांनी त्यांना आज निरोप दिला.

जिल्ह्यातून जवळपास साडे बाराशे मजुरांना रेल्वेनी त्यांच्या राज्यात स्वगावी पाठविण्यात आले आहे. बिहार, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, झारखंड अशा विविध राज्यात नागपूर,वर्धा येथून रेल्वेने मोठ्या प्रमाणात मजूर आपल्या प्रांतात जात आहे. या मजुरांना महाराष्ट्राने रोजगार दिला आहे. वर्षानुवर्षे हे मजूर याठिकाणी रहिवास आहे. त्यामुळे चंद्रपूर सोडतांना त्यांचे अंतःकरण जड झाले.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेळात वेळ काढून या मजुरांना निरोप देण्यासाठी पडोली परिसरात भेट दिली. यावेळी आमदार सुभाष धोटे,आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड यांच्यासह मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून झारखंडच्या मजुरांना रवाना करण्यात आले.त्यांच्यासाठी वाहन व्यवस्था तसेच त्यांच्या रेल्वेच्या तिकिटांची व्यवस्था देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आली आहे. ते झारखंडच्या डालटंन गंज या स्टेशनला पोहचणार आहे. सोबतच त्यांच्या खान पानाची देखील यावेळी व्यवस्था करण्यात आली .

जिल्ह्यातून नागपूर पर्यंत जाण्याची व्यवस्था बसने मोफत करण्यात आली होती. जवळपास 201 मजूर आज रवाना झाले.त्यांना 5 बसच्या माध्यमातून जेवणाची, चहा पाण्याची व्यवस्था करून त्यांना सोडण्यात आले. यामध्ये अनेक सामाजिक, राजकीय संघटनांनी ही आपले योगदान सहकार्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

कोरोना संक्रमण काळामध्ये घरापर्यंत जाताना सॅनीटायझरचा वापर करा, शारीरिक अंतर ठेवून बसा, गोंधळ घालू नका व परस्परांना स्पर्श करू नका, अशा सूचना यावेळी लोकप्रतिनिधींनी केल्या. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर अतिशय भावनिक वातावरणात मजुरांनी देखील लोकप्रतिनिधीने सोबत चर्चा केली. यावेळी अन्य प्रवासी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते.अनेक बांधव आपले घरी जाण्यास उत्सुक असून त्यांच्यासाठी देखील व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती यावेळी या पैकी काही लोकांनी केली.येत्या काळामध्ये पश्चिम बंगाल, गुजरात, जम्मू कश्मीर व अन्य उत्तरेकडील राज्यासाठी रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. यापूर्वी तेलंगाना व आंध्रप्रदेश मधून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यातील मजूर परतले आहेत तर औद्योगिक प्रतिष्ठानमध्ये उत्तर प्रदेश झारखंड, मध्य प्रदेश, बिहार या ठिकाणचे मजूर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या