चंद्रपूर, दि. 14 जून : चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती विद्युत वरखेडकर रुजू झाल्या आहेत. यापूर्वीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्री मुंबई येथे रुजू झाल्यानंतर जिल्ह्यातील हे पद रिक्त होते. 9 जून रोजी त्यांनी चंद्रपूर येथील आपला पदभार स्वीकारला आहे.
विधी स्नातक व प्रकल्प व्यवस्थापनामध्ये स्नातकोत्तर पदवी असलेल्या विद्युत वरखेडकर यापूर्वी सातारा येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यापूर्वी त्यांनी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात उपजिल्हाधिकारी (महसूल) म्हणून काम सांभाळले आहे. तत्पुर्वी त्यांनी पुणे महानगर विभागीय विकास प्रन्यासमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (आस्थापना), कोल्हापूर येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो), पुणे येथे उपजिल्हाधिकारी (भूमी अधिग्रहण), राष्ट्रीय महामार्ग मिशन मध्ये उपजिल्हाधिकारी (भूमी अधीग्रहण), सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे उपविभागीय अधिकारी, यशदा या राज्य शासनाच्या प्रथित यश प्रशिक्षण संस्थेत सहयोगी प्राध्यापक तर नवी दिल्ली येथे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर कार्य केले आहे. ऑगस्ट 2000 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत त्या उपजिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाल्या आहेत.
पदोन्नतीला राज्याच्या सीमावर्ती भागात काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे अनेक वर्ष पुणे विभागात कार्यरत असतानाही त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याची स्वेच्छेने निवड केली. 'डायरी ऑन द व्हील ' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. विविध विषयावरील लेखन, प्रवास करणे, हे त्यांचे आवडीचे विषय आहे.
0 टिप्पण्या