मुंबई : मुंबई, ठाणे, रायगडसह सिंधुदुर्गपर्यंतच्या किनारपट्टीतील सर्व कार्यालये आणि उद्योग निसर्ग चक्रीवादळामुळे ३ आणि ४ जूनला बंद राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
या चक्रीवादळाबाबत राज्यातील जनतेशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, की ३ जूनपासून आपण पुनश्च हरिओम करणार होतो; परंतु या चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या भागातील नागरिकांनी घरीच राहणे अतिशय आवश्यक आहे. कोणीही अजिबात घराबाहेर पडू नका. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. ज्याप्रमाणे कोरोनाला रोखून त्याला परतवण्याच्या आपण मागे आहोत त्याचप्रमाणे या चक्रीवादळातूनही सहीसलामत बाहेर पडू.
संकटाच्या छाताडावर चाल करून आपल्याला जायचे आहे. बुधवारी दुपारपर्यंत हे वादळ धडकणार आहे. अशा वेळी नागरिकांनी विजेचा कमीत कमी वापर करावा किंवा घरातील वीज बंद ठेवावी. वीजप्रवाह खंडित करण्याचीसुद्धा वेळ येऊ शकते. घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात. हंगामी शेडमध्ये वा मोडकळीस आलेल्या जागेत आडोशाला जाऊ नये. किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवा प्रशासनाला सहकार्य करा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीकेसी मैदानावर उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील रुग्णांना अन्य हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
0 टिप्पण्या