एक एप्रिलपासून जिल्ह्यात
2.73 कोटीचे कर्ज वाटप
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाभरातील बँक प्रतिनिधी कृषी विभाग व विविध महामंडळांच्या प्रतिनिधीशी बोलतांना त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करतांना अटी व शर्ती मध्ये न अडकवता पतपुरवठा करावा, असे आवाहन केले.
या बैठकीला खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर ,आ. किशोर जोरगेवार, आ. सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते .
राज्य शासनाने 2019 मध्ये कर्जमाफी योजना केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँकांना दिल्या आहेत. कोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायचे राहिले, असेल तरीही त्यांना कर्ज देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पतपुरवठा सुरळीत व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 1 एप्रिल पासून 31 मे पर्यंत 273.82 लाख कर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी शिखर बँकेचे समन्वयक एस.एन.झा यांनी दिली.
यावेळी पालकमंत्र्यांनी महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, अण्णासाहेब साठे महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ यांच्या मार्फत होणाऱ्या पतपुरवठ्याचाही आढावा घेतला. विविध क्षेत्रातील लोकांना अर्थपुरवठा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या या महामंडळाकडून राज्य शासनाला मोठी अपेक्षा असून त्यांनी योग्य प्रमाणात पतपुरवठा करावा,अशी सूचना देखील यावेळी त्यांनी केली.
कोरोना आजाराच्या प्रादुर्भावाच्या काळात शेतकऱ्यांना पतपुरवठ्यामुळे पुढच्या हंगामाचे नियोजन करता आले नाही असे व्हायला नको. यासाठी सर्व अडथळे दूर करण्याबाबतची सूचना देखील त्यांनी यावेळी केली.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना :
राज्यात कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार करून आता सर्वांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कोरोनासह सर्वच आजारासाठी आता जवळपास सर्वांना या योजनेअंतर्गत उपचाराचा लाभ मिळणार आहे. कोरोनासाठी या योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांना देखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड-19 आजारासाठी उपचार परवानगी देण्यात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पिवळे,केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना ,शिधापत्रिकाधारक कुटुंबे आणि शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबे तसेच बांधकाम कामगारांना देखील लाभ मिळणार आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजने मध्ये सामाजिक आर्थिक व जात निहाय जनगणना 2011 मधील नोंदीत लाभार्थी कुटुंबे समाविष्ट असून ग्रामीण भागासाठी स्वाभाविक निकष व शहरी भागासाठी व्यावसायिक निकष ठेवण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला रहिवासी पुरावा म्हणून पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र शिधापत्रिका, पात्र ठरविण्यात आली आहे.31 जुलै 2020 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहचावी यासाठी योजनेच्या पोस्टरचे अनावरण पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले.
0 टिप्पण्या