पालकमंत्र्यांनी घेतली मान्सून पूर्व तयारी संदर्भात चंद्रपूर मनपाने केलेल्या उपाययोजनांची माहिती!



  • मनपा क्षेत्रातील रस्त्यांची प्रलंबित कामे
  • तातडीने पूर्ण करा: पालकमंत्री ना. वडेट्टीवार
  • चंद्रपूर महानगरपालिकेच्या कामकाजाचा पालकमंत्र्यांचा आढावा

चंद्रपूर, दि. 2 जून : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या प्रलंबित कामाची पूर्तता पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी. या कामाकडे अधिक लक्ष द्यावे, तसेच कोरोना संसर्गाच्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये कोणतीच साथ उद्भवू नये, यासाठी शुद्ध पाण्याची वितरण व्यवस्था नेटकी करावी, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर महानगरपालिकेतील कामकाजाचा आढावा घेतला.या बैठकीला महापौर राखी कंचर्लावार,आयुक्त राजेश मोहिते, यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मान्सून पूर्व तयारी संदर्भात चंद्रपूर महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली.जिल्ह्याच्या आणि महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर सध्या कोरोनामुळे प्रचंड दबाव आहे. या दबावामध्ये अन्य कोणत्याही साथ रोगाचा उद्रेक होणार नाही. याची काळजी घेणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने अमृत योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रस्त्याचे खोदकाम केलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात अशुद्ध पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात घनकचऱ्याची विल्हेवाट, स्वच्छता व अशुद्ध पाण्यावर अधिक लक्ष देण्याची सूचना, देखील त्यांनी यावेळी केली. सोबतच महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, पाणीपुरवठा योजना, दलित वस्ती सुधारणा योजना, पावसाळ्यापूर्वी सुरू असलेले नियोजन, यासंदर्भातही आढावा घेतला.महापौर राखी कांचर्लावार यांनी या बैठकीमध्ये पालकमंत्री हे महानगरपालिकेचे देखील पालक असून त्यांनी महानगरपालिकेसाठी अतिरिक्त 20 कोटी रुपये द्यावे अशी मागणी केली. तसेच जिल्हा नियोजनमधून गेल्या वर्षी मिळालेला निधी या वर्षी देखील त्याच प्रमाणात मिळावा अशी मागणी देखील केली.

या बैठकीला सुरुवात करतांना महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी महानगरपालिकेमार्फत सुरू असणारे उपक्रम व कोरोना प्रतिबंधासाठी 1200 कर्मचाऱ्यांच्या चमूने गेल्या तीन ते चार महिन्यात केलेल्या कामकाजाचा आढावा सादर केला. यावेळी त्यांनी 537 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन संदर्भातील महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सद्यस्थिती सांगितली.याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, सभागृह नेता वसंत देशमुख, विरोधी पक्ष नेते डॉ.सुरेश महाकुलकर, नगरसेवक संजय कंचर्लावार, संदीप आवारी, रवी आसवानी, नंदू नागरकर, दीपक जयस्वाल,अमजद अली, नगरसेविका सुनीता लोढ़िया, संगीता भोयर, उपायुक्त विशाल वाघ, गजानन बोकडे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सचिन पाटील, शीतल वाकडे, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर, अनिल घुमडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या