एमआयडिसी संदर्भातील सर्व निर्णय चंद्रपूर किंवा नागपूर या ठिकाणी व्हावे-रुंगठा #midc #runghatha



कोरोनामुळे मंदावलेल्या चंद्रपूर एमआयडीसीला

गती देण्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांचे आवाहन

एमआयडीसी व जिल्हा उद्योग केंद्राच्या कामकाजाचा घेतला आढावा

ब्रम्हपुरी येथे एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करण्याची सूचना


चंद्रपूर, दि. 1 जून : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मजुरांची कमतरता, सोशल डिस्टनसिंग, संचारबंदी,यामुळे मंदावलेल्या जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायाला गती देण्यासाठी एमआयडीसी व जिल्हा उद्योग केंद्राने व्यापारी उद्योजकांच्या मदतीला सकारात्मकपणे पुढे यावे, एमआयडीसीमध्ये नव्या उद्योजकांना चालना देण्यासाठी नव्या धोरणाची आखणी करावी, रिकामे भूखंड इच्छुकांना सहज उपलब्ध करावे, अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज आयोजित बैठकीत केल्या.

या बैठकीला खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर,आ. प्रतिभा धानोरकर, आ. किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, यांच्यासोबतच जिल्ह्यातील विविध व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी, उद्योजक उपस्थित होते.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड यांनी सादरीकरण केले. जिल्ह्यातील उद्योग व्यवसायाची सद्यस्थिती व कोरोना आजारा पूर्वी जिल्ह्यात असणाऱ्या व्यापार उद्योगाची परिस्थिती, याबाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली.

या बैठकीत खासदार सुरेश धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार यांनी एमआयडीसी परिसरातील जे भूखंड वापरात नाही. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहित करण्याचा मुद्दा उपस्थित केला. उद्योग-व्यवसायात आवड असणाऱ्या तरुणांना याबाबतची माहिती पोहोचत नाही. त्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी भानुदास यादव या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हा भूखंड उपलब्ध केला जातो, असे स्पष्ट केले. तथापि, जिल्हास्तरावर हा भूखंड सहज सुलभतेने उपलब्ध व्हावा, यासाठी एमआयडिसी संदर्भातील सर्व निर्णय चंद्रपूर किंवा नागपूर या ठिकाणी व्हावे अशी अपेक्षा यावेळी एमायडिसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी व्यक्त केली.

येथील राईस मिलचे व्यवस्थापक श्री. भटकर यांनी यावेळी अधिक अंग मेहनतीचे काम करणारे अन्य राज्यातील मजूर गावाला गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायाला झळ पोहोचत असल्याचे लक्षात आणून दिले. स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रतिनिधींचा आग्रह आहे. मात्र अंग मेहनतीचे काम करण्याकडे स्थानिक कामगारांचा कल नसतो. ही बाब त्यांनी यावेळी लक्षात आणून दिली. तथापि, मोठ्या प्रमाणात एमआयडीसी उद्योग समूहामध्ये रिक्त असणाऱ्या जागांवर स्थानिक कामगारांना संधी देण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री व अन्य लोकप्रतिनिधींनी दिले.

एमआयडीसी परिसरात सध्या नव्याने उद्योग व्यवसायात येणाऱ्या तरुणांना प्रधानमंत्री रोजगार योजना व मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी बँक प्रतिनिधींना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केली. या चर्चेत मधुसूदन रुंगठा, मेघनाथ जॉनी व उपस्थित बँकेच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.

एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात असणाऱ्या मोठ्या उद्योगांना पूरक असे व्यवसाय उभारण्याची संधी द्यावी व सिमेंट कारखान्यांना स्थानिक स्तरावरून पूरक साहित्य घेण्याचे निर्देशीत करावे, अशी मागणीही एमआयडीसी व्यापारी प्रतिनिधींनीनी केली. जिल्ह्यातील प्रमुख सिमेंट कारखान्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.

केंद्र शासन पुरस्कृत फ्लाय अॅश क्लस्टर पुनर्जीवित करण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. केंद्र शासनाकडून काही निधी आला असून उर्वरित निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली. राईस मिल उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात एक सर्वंकष धोरण बनविण्यात यावे,तसेच जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीना गतिशील करण्यात यावे, ब्रह्मपुरी येथे एमआयडीसी सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, आदी विषयांवर देखील यावेळी चर्चा झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या