मोकाट फिरणारी डुकरे (वराह) गडचांदुरकरांसाठी डोकेदुखी !
गडचांदुर : गडचांदुर शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या डुकरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गडचांदुर न. प. प्रशासनाला याबाबत नागरिकांनी अनेकदा निवेदने ही दिली आहेत, कोरोनाच्या बिकट परिस्थितीनंतर स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
गडचांदुरांतील मोकाट डुकरांचा येत्या आठ दिवसांत न.प. कर्मचाऱ्यांच्या मदतीने बंदोबस्त केल्या जाईल असे न.प. उपाध्यक्ष शरद जोगी यांनी नुकतेच एका व्हॉटस्अॅप ग्रुप वर कमेंट केली होती, डुकरे पकडण्यासाठी कंत्राट दिले असून ते काम न.प. कर्मचाऱ्यांचे नाही, उपाध्यक्ष जोगी गडचांदुरकरांची दिशाभूल करीत आहे, असा हल्ला भाजपचे नगरसेवक अरूण डोहे यांनी त्यांच्या प्रतिउत्तरात केला आहे.
गडचांदुर मध्ये आत्तापावेतो ५ बाधित मिळाले आहे. नगरसेवक अरूण डोहे हे सध्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये येतात, त्यामुळे त्यांनी व्हिडीओ चा माध्यमातून हा आरोप केला आहे. सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी कोरपना तालुक्यातील काही व्हॉटस् ग्रुप वर गडचांदुर मध्ये मोकाट फिरणाऱ्या डुकरांचे (वराह) फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर गडचांदुर न. प. चे उपाध्यक्ष शरद जोगी यांनी २ जुलै रोजी व्हॉटस् ग्रुप वर 'मोकाट जनावरे व डुकरांचा त्रास सहन करावा लागत असल्याने मी शहरवासीयांची माफी मागतो. कोरोना संकटामुळे याला वेळ लागला पण आता मी स्वतः, नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, सभापतीगण यांनी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून येत्या ८-१० दिवसात ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढू व नगरवासीयांना यातून मुक्त करू, नागरिकांनी सुद्धा यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे आपले मत या ग्रुप वर व्यक्त केले आहे. गडचांदुर न.प. चे भाजपचे नगरसेवक अरूण डोहे यांनी न.प. चे उपाध्यक्ष शरद जोगी हे गडचांदुर च्या नागरिकांची दिशाभुल करीत असून नगर परिषदेचे कर्मचारी हे डुकरे पकडत नसुन डुकरे पकडण्यासाठी राजुरा येथील एका व्यक्तीला नगर परिषदेने कंत्राट दिले असल्याचे स्पष्ट करीत खोटी माहिती न.प. उपाध्यक्ष देत असल्याचे म्हटले आहे. तसेच ८-१० दिवसानंतर ही गडचांदुर शहरात डुकरांचा बंदोबस्त झालेला नसून नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर जोगी यांचा वचक राहिलेला नसल्यामुळे न.प. चा संपूर्ण कारभार हा बेशिस्त झाला असल्याचा सरळ हल्ला उपाध्यक्ष शरद जोगी यांचेवर केला आहे. गडचांदुर न.प. मध्ये काँग्रेस-राका ची सत्ता असून भाजपचे तिन व शिवसेना पाच अशी संख्या आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्षा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशी सत्ता गडचांदुर न.प. मध्ये आहे. अरूण डोहे हे गडचांदुर चे भाजपचे वजनदार नगरसेवक असून यापुर्वी त्यांच्या धर्मपत्नी या गडचांदुर न.प. मध्ये नगराध्यक्षा राहिल्या आहेत तर शरद जोगी हे यापुर्वी ही गडचांदुर चे नगरसेवक होते.
0 टिप्पण्या