चंद्रपूर ची सेवा कायम स्मरणात राहील-डॉ. कुणाल खेमनार



मावळते जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना भावपूर्ण निरोप !

निरोप समारंभानंतर केले प्रभार हस्तांतरण !

कार्यक्रमानंतर मावळते जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी नवे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली. प्रभार हस्तांतरण केल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी यावेळी ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित चर्चा केली. मंथन हॉलमधील निरोप समारंभ झाल्यावर मावळते जिल्हाधिकारी डाॅ. कुणाल खेमनार यांनी प्रभार हस्तांतरण केले. नवे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली.

चंद्रपूर, दि. 12 ऑगस्ट : कोरोना संसर्ग काळामध्ये जिल्हा प्रशासन आणि सामान्य जनता यातील विश्वासाचे नाते आणखी घट्ट करण्याची जबाबदारी पुढील काळात आपल्या सर्वांवर आहे. जनतेने अतिशय संयमाने, संयत भूमिकेने या काळात प्रशासनाला साथ दिली आहे. कोरोना पुढील काळात आणखी वाढू शकतो. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेने आणखी सतर्कतेने जनतेच्या सेवेमध्ये वाहून घ्यावे, असे आवाहन मावळते जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज डॉ.कुणाल खेमनार यांचा भावपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील आणखी एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे प्रस्तावित निरोप समारंभ नियोजन भवन ऐवजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉलमध्ये घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, महसूल यंत्रणेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, वेगवेगळ्या विभागाचे विभाग प्रमुख, पोलिस विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आजचा हा भावपूर्ण निरोप समारंभ पार पडला.

निरोपाला उत्तर देताना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गेली दोन वर्ष चंद्रपूरकरांची सेवा करताना वेळ कसा गेला कळलेच नसल्याचे सांगितले. लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर कोरोना संक्रमण काळाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या कसोटीवर काम करण्याची या काळात संधी मिळाली. चंद्रपूरच्या जनतेची प्रचंड साथ या काळात जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. ज्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार व कायद्याप्रमाणे एक टीम बनवून काम केले. त्याचप्रमाणे जनतेने देखील प्रत्येक नव्या भूमिकेचे स्वागत करून उत्तम प्रतिसाद दिला. कोरोनाचा पुढील काळ आणखी कठीण असणार आहे. अशावेळी हा विश्वास आणखी घट्ट राहिला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून काम करा, असे आवाहन त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केले.

जिल्ह्यात सक्षम अधिकारी-कर्मचाऱ्यांची उत्तम साथ मिळू शकल्यामुळे काम करता आले. विशेषत: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासारख्या सकारात्मक व नव्या दमाच्या अधिकाऱ्यांसोबत एक टीम म्हणून काम केल्यामुळे अनेक गोष्टी सहजतेने पूर्ण करता आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

शासकीय नोकरीमध्ये बदली हा अपरिहार्य भाग असतो. पण या ठिकाणची दोन वर्ष कायम स्मरणात राहणारी आहे. जिल्ह्यातील सामान्य जनतेपासून सामाजिक संघटना, राजकीय संघटना, सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संबोधित करताना डॉ. कुणाल खेमनार यांच्या काळामध्ये सामान्य माणसाचा प्रशासनावर वाढलेला विश्वास हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते, असे त्यांनी सांगितले. पोलीस दलाला वेगवेगळ्या योजनांमध्ये निधी उपलब्ध करून देण्यापासून पोलीस दल आणखी सक्षम होईल, याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. त्यामुळे सीसीटीव्ही सारख्या उपक्रमांमध्ये अनेक जिल्ह्यांपेक्षा वेगळे कार्य या जिल्ह्याला पूर्ण करता आले. त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तातडीने प्रतिसाद देत प्रत्येक काम पार पाडण्याची त्यांची तऱ्हा जनतेला भावली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील नव्या दमाच्या अधिकाऱ्यांसाठी अतिशय मार्गदर्शक अशी भूमिका त्यांची राहिली आहे. कोरोना काळातही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे वेगवेगळ्या क्षेत्रात सुरू राहील. याकडे त्यांनी लक्ष ठेवले. सहकारी अधिकाऱ्यांच्या क्षमतेचा उत्तम उपयोग व एक चमू बनून काम करण्याची त्यांची पद्धत उत्साहवर्धक होती, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केले. यावेळी वरोऱ्याचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, राजुऱ्याचे तहसिलदार रविंद्र होळी, महसूल कर्मचारी संघटनेचे विभागीय पदाधिकारी राजीव धांडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अधीक्षक श्रीमती तेजस्विनी पाटील यांनी या कार्यक्रमाचे संचलन केले.तर निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी आभार प्रदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या