दारू चे "चक्कर" जिल्ह्याला करतयं "घनचक्कर" !



  • जिल्ह्यात दारूचा फोफावत असलेला घातक व्यवसायाचे वास्तव !

  • दारूच्या व्यवसायातून संपत्ती गोळा करणाऱ्या भ्रष्ट पोलिसांच्या संपत्तीची चौकशी करा-विक्रेत्यांची मागणी

चंद्रपूर : मंगळवार-बुधवार पोळा व पाडव्याच्या मुहूर्तावर स्थानिक पोलिसांनी घिरट्या मारणे सुरू केले. दारूवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी या घिरट्या असेल असा बहुतेकांचा गैरसमज असू शकतो परंतु तसे काहीही घडतांना दिसत नाही. पोलिसांचे येणे व तसेच परत जाणे फार काही सांगून जाणारे आहे. असेच मंगळवार दि. १८ रोजी पाडवा (तान्हा पोळा) निमीत्त एका दारूवाल्याच्या घरासमोर कर्तव्यावर असणारा पोलीस अधिकारी दुचाकी गाडीने गणवेशात आला. आता काहीतरी घडते या विचारात उपस्थित असणार्‍यांना धडकी भरली परंतु तसे काहीही झाले नाही. एका विक्रेत्याशी हा पोलिसवाला कानाफुसी करून मार्गाला लागला. थोड्या अंतरावर उभा राहून कशाची तरी वाट बघू लागला. बहुतेक अन्य चमुना तो बोलवत असेल असे उपस्थितांना वाटू लागले, परंतु काही अवधीनंतर दारूवाला त्याच पोलिसांपाशी जाऊन त्याच्या हातात काहीतरी देऊन परत आला. "बिदागी पुर्वीच घेऊन गेला आत्तता "भोजाऱ्या" साठी आला होता" असं मिश्कीलपणे सांगत विक्रेत्यांने प्रकरणाला पूर्णविराम दिला. काय घडले असेल? हे कळायला उपस्थितांना जादा अवधी लागला नाही. हा "भोजारा" म्हणजे पाडव्याची व्यवस्था होती, असे जिल्ह्यात खुलेआम सुरू आहे. अवैध दारू व्यवसायात काही भ्रष्ट पोलिसांनी कमाविलेली "माया" याचाही तपास व्हायला हवा, असे दारूवाले अप्रत्यक्ष सांगतात त्याचा गांभीर्याने विचार करणारा अधिकारी जिल्ह्याला मिळालेला नाही हे खरेचं या जिल्ह्याचे दुर्भाग्य आहे.

मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात दारू मोठ्या प्रमाणात येत असल्याचे चित्र आहे. त्या मानाने होणारी कारवाई ही नगण्य आहे. पाडवा सणाला खाद्य रसिकांची मेजवानी असते, पाणी सोबत रसपाणी असतोच. दारूचा भला मोठा साठा जिल्ह्यात जमा करण्यात आला, त्यावर प्रतिबंध लागावा म्हणून स्थानिक पोलिसांच्या चकरा होत्या परंतु या साऱ्यावर मात करत दारू व्यवसाय जसाचा तसा पण त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात पाडव्याच्या सणाला होतांना दिसत आहे. वर घडलेला प्रसंग याचे बोलके उदाहरण आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील दारू चे "चक्कर" हे "घनचक्कर" बनवणारे आहे. 1 एप्रिल 2015 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदीची घोषणा करण्यात आल्यापासून हे "घनचक्कर" जिल्हावासियांच्या मागे लागले आहे. मागे वळून पाहतांना अनेक विचार करणाऱ्या गोष्टी या नजरेसमोर येतील. हजारोच्या संख्येने पकडण्यात आलेले दारू विक्रेते, लाखोच्या संख्येने नष्ट करण्यात आलेली दारू, करोडोंच्या संख्येने विकण्यात आलेली दारू या सगळ्याच्या ताळमेळ बसविला तर चक्क हा दारू च्या"घनचक्कर" चा खेळ अक्कल असलेल्यांच्या डोक्यात सहज बसू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या