- धक्क्याने वडील नारायण चुंचूवार यांचा ही मृत्यू !
- शासकीय रूग्णालयावर विश्र्वास नाही, खाजगी मध्ये बेड नाही !
तुकूम प्रभागाचे काँग्रेसचे माजी नगरसेवक गजानन चुंचूवार यांचे काल दुःखद निधन झाले. 50 वर्षीय गजानन चुंचूवार हे मागील काही दिवसापासून आजारी होते. काल रविवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी त्यांचे पल्स कमी होत असल्याचे दिसल्यामुळे शहरातील काही रूग्णालयामध्ये त्यासंबंधात विचारणा करण्यात आली असता रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. शहरांमध्ये खाजगी व शासकीय रूग्णालयात कोरोना स्थिती उद्भवल्यानंतर शासकीय रुग्णालयांमध्ये बेडची व्यवस्था नाही ही भयावह स्थिती झाली आहे. गजानन चुंचूवार यांचा मृत्यू आरोग्य विभागाचे धिंडवडे काढणारा आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर रात्रोचं त्यांचे वडील नारायण चुंचूवार हे सुद्धा धक्क्याने दगावले. एका घरी दोन जणांचा मृत्यूमुळे चंद्रपूर शहरांमध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसापासून गजानन चुंचूवार आजारी होते. त्यांना घरी ऑक्सिजन लावण्यात आले होते, परंतु काल एकाएक प्रकृती अस्वस्थ वाटत असल्यामुळे चंद्रपुरातील ख्रिस्तानंद हॉस्पिटल येथे विचारणा करण्यात आली असता त्या ठिकाणी बेड नसल्याचे सांगण्यात आल्यामुळे सावंगी मेघे येथे रुग्णाला हलविण्याच्या प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला विचारपूस करून सावंगी मेघे ला गजानन चुंचूवार यांना हलविण्यात येत असताना सोबत एक ऑक्सीजन सुद्धा घेण्यात आले परंतु सावंगी मेघे इथे पोहोचण्यापूर्वी सावंगी मेघे येथे बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्यामुळे मंचेरियाल याठिकाणी उपचार होण्याची शास्वती मिळाल्यामुळे त्यांना मंचेरियल कडे हलविण्यात येत असतानाच त्यांच्या रस्त्यात मृत्यू झाला. चंद्रपूर शहरांमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी बेड मिळत नाही. यासारखी दुर्गती दुसरी काय म्हणावी लागेल. गजानन चुंचूवार यांच्या मृत्युच्या धक्क्याने त्यांचे वडील नारायण चुंचूवार यांचा सुद्धा रात्री मृत्यू झाला. गजानन चुंचूवार यांचा मृत्यू चंद्रपूर शहरातील आरोग्य विभागाचे धिंडवडे काढणारी घटना आहे. मागील काही दिवसापासून आरोग्य विभागावर विविध प्रकारचे ताशेरे ओढले जात आहे परंतु मुर्दाड आरोग्य विभागाला जाग येत नाही, यासारखी दुर्दैवी बाब दुसरी काय असू शकते.
कोरोना ची भयावह स्थिती निर्माण झाल्यावर चंद्रपूर जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. आजची स्थिती बघता बाधितांसोबत मृतकांची संख्याही वाढत आहे. जिल्हा आरोग्य विभागावर सामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही. आरोग्याची चाचणी करण्यासाठी लोक समोर येत नाही आहेत. मृतकांचे नातेवाईक आरोग्य विभागावर आरोप करित आहेत. आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर विश्वासच राहिला नाही, असे खुलेआम बोलले जात आहे. जिल्हा प्रशासन, शासन आज याबाबतीत फक्त आश्वासन देऊन राहिला आहे. परंतु सामान्यजनांच्या मनातील भीती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही स्थिती आटोक्यात न आल्यास नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही. विनाकारण जिव गमवावा लागत असल्याच्या भावना व्यक्त होत आहे. गजानन चुंचूवार यांचा मृत्यू हा आरोग्य विभागाचे लचके तोडणारा आहे. गजानन चुंचूवार यांच्या मृत्यूने समाजमन हेलावलेले आहे.
0 टिप्पण्या