उद्यापासून च्या जनता कर्फ्यू बाबत जनताच संभ्रमात!



  • काय सुरू ? काय बंद ? अद्याप लेखी दिशानिर्देश मिळालेचं नाही!

  • जनता कर्फ्यू म्हणजे एक स्वनिर्णय आहे!

  • मला घरामध्येच राहायचे आहे असे नागरिकांनी स्वतःहून ठरवायला हवे तरच जनता कर्फ्यू यशस्वी होऊ शकतो!

चंद्रपूर : उद्या गुरुवार दिनांक 10 पासून चंद्रपूर शहर व बल्लारपूर शहरांमध्ये जनता कर्फ्यू लागणार आहे. कोरोना संक्रमणावर नियंत्रणासाठी हा जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले परंतु या जनता कर्फ्युमध्ये व्यावसायिकांना करायचे काय आहे? याबाबतचे निर्देश देण्यात न आल्यामुळे जनता कर्फ्युबाबत जनतेमध्ये अद्यापपावेतो संभ्रम निर्माण झाला आहे. उद्यापासून काय होईल ? कोणती दुकाने किती वाजेपर्यंत चालू राहतील ? व कोणती दुकाने बंद राहतील? याबाबत जनतेमध्ये असामंजस्य पसरले आहे.

यासंदर्भात चंद्रपूर शहरातील मान्यवरांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कोणतेही दिशानिर्देश आले नसल्याचे स्पष्ट केले. अन्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले तर वृत्त लिहिस्तोवर चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेशजी मोहिते व जिल्हाधिकारी अजित गुल्हाने यांनी भ्रमणध्वनी उचललाच नाही. शहरातील काही व्यापाऱ्यांनी यापूर्वीच जनता कर्फ्यूमध्ये आपले समर्थन असल्याचे जाहीर केले. त्यामध्ये विशेषत्वाने सराफा असोसिएशन व चार्टर्ड अकाऊंडेंट संघटनेने जनता कर्फु ला पाठिंबा दर्शविला आहे. परंतु अन्य छोटे-मोठे व्यवसायिक शहरांमध्ये अजूनही संभ्रमात आहे. आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे ऑटोद्वारे दुकाने बंद करण्याचे आव्हान करण्यात आले अन्यथा कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले, परंतु कोणती दुकाने सुरू राहतील याविषयी कोणतेही दिशानिर्देश मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले नाही, त्यामुळे हा जनता कर्फ्यु किती यशस्वी होईल याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
चंद्रपूर शहरांमध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या व घातक परिस्थितीमध्ये रोज होत असलेली मृतकांची संख्या याबाबत भयावह स्थिती आहे. जिल्ह्यातील कोरोना संक्रमणावर नियंत्रणासाठी चंद्रपूर व बल्लारपुर शहरांमध्ये जनता कर्फ्यू लावण्यात आला. यापूर्वी 22 मार्च 2020 रोजी संपूर्ण भारताने व भारतातल्या नवीन पिढीने पहिल्यांदाचं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लावलेला जनता कर्फ्यू बघितला होता. यावेळी नरेंद्रजी मोदी यांनी जनतेला कोरोनावर मात करण्यासाठी "जनता कर्फ्यु" पाळण्याचे व कोणीही घराच्या बाहेर न निघण्याचे आवाहन केले होते. संपूर्ण भारत देशाने मोदी यांच्या आदेशाचे पालन करत घरात राहणे पसंत केले. त्यानंतर सायंकाळी टाळ्या वाजून कोरोना योद्धाचे स्वागत करण्याचे आव्हान करण्यात आले होते परंतु काही नतद्रष्टांनी याचा वेगळा अर्थ काढून "अनर्थ" केला. त्यानंतर देशातील स्थिती बिघडत गेली परंतु चंद्रपूर जिल्हा मात्र शेवटपर्यंत सुरक्षित होता अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे मे महिन्यात जिल्ह्यामध्ये पहिला पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येत पावेतो जिल्ह्याची स्थिती फारच भयावह झालीआहे. आज जिल्ह्यातील प्रत्येकाला मृत्यूचा भय सतावत आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागाची स्थिती ही अत्यंत शोचनिय आहे. मृतकांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. आरोग्य विभागावर ताशेरे ओढले जात आहे. मृतकांचे नातेवाईक संशय निर्माण करत आहे व बाधितांची संख्या ही तीन आकडी च्या प्रमाणात वाढत आहे. सामान्यजनांना जगावे-मरावे की कोरोनाशी लढावे ही द्विधास्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून गुरूवार दि. 10 पासून चार दिवसांच्या जनता कर्फ्यु चे आवाहन चंद्रपूर व बल्लारपूर शहरांमध्ये करण्यात आले. जनता कर्फ्यू तोंडावर येऊन ठेपला असताना काय सुरू राहील? काय बंद राहील ? याबाबत कमालीचा संभ्रम शहरवासीयांनी मध्ये निर्माण झाला आहे.

जनता कर्फ्यू म्हणजे एक स्वनिर्णय आहे. आपल्या आरोग्यासाठी जनतेने स्वतःहून निर्णय घेण्याची ही वेळ आहे. मला घरामध्येच राहायचे आहे असे नागरिकांनी स्वतःहून ठरवायला हवे तरच जनता कर्फ्यू यशस्वी होऊ शकतो. आजची भयावह स्थिती बघता प्रत्येक व्यवसायिकांनी व घराच्या बाहेर निघणाऱ्या प्रत्येक जबाबदार-बेजबाबदार नागरिकांनी हा जनता कर्फ्यु पाळायला हवा, तेव्हाच जनता कर्फ्यु चा उद्देश यशस्वी होऊ शकेल, अन्यथा "आजचे मरण उद्यावर ढकलले" एवढाच याचा अर्थ पकडला जाईल. परंतु आजच्या स्थितीमध्ये जनता कर्फ्यू मध्ये लोकांना-नागरिकांना-छोट्या व्यावसायिकांना करायचे काय? हे अद्याप ही समजले नाही. शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमाची अवस्था वृत्त लिहिस्तोवर आहे. कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी-नेत्यांनी जनतेला याबाबत आव्हान केले नाही ही स्थिती आज चंद्रपूर-बल्लारपूर शहरांमध्ये दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या