देशाला विश्‍वगुरू बनविण्‍याच्‍या पंतप्रधानांच्‍या संकल्‍पात चंद्रपूरच्‍या सैनिक शाळेने महत्‍वपूर्ण योगदान द्यावे – आ. सुधीर मुनगंटीवार




  • चंद्रपूरच्‍या सैनिक शाळेत वायुसेना दिवस उत्‍साहात साजरा !
चंद्रपूर : जेव्‍हा आपण भारतीय वायुसेनेचे 125 वर्षे पूर्ण करू तेव्‍हा भारतीय वायुसेनेचा प्रमुख चंद्रपूरच्‍या सैनिक शाळेचा विद्यार्थी असेल असा विश्‍वास व्‍यक्‍त करत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भारताला विश्‍वगुरू बनविण्‍याच्‍या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या संकल्‍पात चंद्रपूरची सैनिक शाळा महत्‍वपूर्ण योगदान देईल, असे प्रतिपादन केले.

दिनांक 8 ऑक्‍टोबर रोजी चंद्रपूर – बल्‍लारपूर मार्गावरील सैनिक शाळेत वायुसेना दिवसानिमीतत आयोजित कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी सैनिक शाळेचे प्राचार्य नरेशकुमार, सार्वजनिक बांधकाम मंडळाच्‍या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत भास्‍करवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. वायुसेना दिवसानिमीत्‍त वायुसेनेत कार्यरत असताना आपल्‍या प्राणांची आहूती देणा-या शूरवीरांना आ. मुनगंटीवार यांनी वंदन केले. उपस्थितांना वायु‍सेना दिनानिमीत्‍त शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, कारगिलच्‍या युध्‍दात महत्‍वपूर्ण भुमीका बजाविणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्रजी निंभोरकर यांची भेट 2015 मध्‍ये झाली. त्‍यांनी सैनिकी शाळेची संकलपना माझ्यासमोर मांडली व त्‍यानंतर त्‍याला मुर्तरूप प्राप्‍त झाले. देशातील या अत्‍याधुनिक, सुसज्‍ज सैनिकी शाळेच्‍या निर्माण कार्यात मी माझे योगदान देवू शकलो यासाठी मी स्‍वतःला भाग्‍यवान समजतो. आपल्‍या देशात वीरता, शौर्य यांची कोणतीही कमतरता नाही. ही भूमी विरांची आहे, शूरांची आहे. ज्‍या भरताच्‍या नावावरून आपल्‍या देशाचे नांव भारत झाले तो भरत त्‍याच्‍या शौर्यामुळेच ओळखला जातो. एकेकाळी आपला देश आर्थिकदृष्‍टया संपन्‍न होता. जगाच्‍या एकूण जीडीपी पैकी 25 टक्‍के जीडीपी आपल्‍या देशाचा होता. इंग्रजांनी दिडशे वर्ष राज्‍य करून आपल्‍याला लुटले, मात्र या देशातील शूरांनी, वीरांनी आपल्‍याला स्‍वातंत्र्य मिळवून देत नवे वैभव बहाल केले. ही शौर्यगाथा पुढे नेण्‍यासाठी चंद्रपूर जिल्‍हयात सैनिकी शाळेची निर्मीती झाली. चंद्रपूर जिल्‍हयात वाघाची संख्‍या सर्वाधिक आहे. या शाळेतील विद्यार्थी वाघांपेक्षाही पराक्रमी ठरतील. चंद्रपूरच्‍या नावात ‘सी’ आहे. चीनने जर भारताकडे चुकीच्‍या नजरेने बघितले तर ते डोळे फोडण्‍याची ताकद चंद्रपूरच्‍या या सैनिकांमध्‍ये निर्माण होईल. यादृष्‍टीने सशक्‍त सैनिक या शाळेतून निर्माण होतील याचा मला विश्‍वास आहे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

चंद्रपूरच्‍या सैनिक शाळेत मुलींना प्रवेश मिळावा अशी सूचना सैनिकी शाळेच्‍या प्राचार्यांनी केली तेव्‍हा तत्‍कालीन संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांच्‍याकडे मी विनंती केली. त्‍यांनी त्‍वरीत ही विनंती मान्‍य करत या सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश मिळेल असा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल निर्मला सितारमण यांचे आभार व्‍यक्‍त करताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, कोरोनाच्‍या महामारीच्‍या कठीण काळातही या सैनिकी शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांनी अतिशय सुंदर सादरीकरण करून हम होंगे कामयाब असा संदेश दिला याचा मला विशेष आनंद असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. हा वायुसेना दिवस केवळ एक दिवस न ठरता पंतप्रधानांचे बलशाली भारताचे स्‍वप्‍न साकार करण्‍याचा संकल्‍प दिवस ठरावा अशी अ‍पेक्षा त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केली.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सैनिकी शाळेचे प्राचार्य नरेश कुमार यांनी केले. यावेळी वायुसेना दिनानिमीत्‍त विद्यार्थ्‍यांनी प्रात्‍यक्षीकांचे ऑनलाईन सादरीकरण करण्‍यात आले. भारतरत्‍न डॉ. ए.पी.जे. अब्‍दुल कलाम संग्रहालय, कारगील मेमोरीयल आदींची पाहणी आ. मुनगंटीवार आणि मान्‍यवरांनी केली. कार्यक्रमाच्‍या प्रारंभी अमर जवान स्‍मारकाला वंदन करण्‍यात आले. यावेळी शिक्षक व कर्मचारीवृंदाची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या