एसटीसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर !



मुंबई : एसटी कर्मचार्‍यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातील घोषणा केली. तसेच शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
एसटी कर्मचार्‍यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही बैठक पार पडली. यावेळी एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनावर तोडगा काढण्यात आल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. शासनाकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यांसाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणार्‍या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. त्यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे. लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या