- पोलिस दलात लवकरचं साफसफाई !
- नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील "अॅक्शन" मोडवर !
मुंबई : पोलीस दलाचं सक्षमीकरण करण्यात येईल. स्वच्छ प्रशासन देण्यावर भर असेल. तसेच प्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप करणार नाही. बदल्याच्या संदर्भात प्रत्येक विभागाची जी पद्धत ठरली आहे, वेगवेगळ्या स्तरावर जे अधिकार दिले आहेत. त्यानुसार काम करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे पोलीस दलामध्ये लवकरच साफसफाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पदभार स्वीकारताच पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या निष्ठा तपासण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात पोलीस दलात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवार दि. ६ एप्रिल रोजी दुपारी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पोलीस दलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठा असलेले अनेक अधिकारी आहेत, त्याबाबत वळसे-पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर, याबाबत सर्व माहिती घेण्यात येईल. कुणाच्या काय निष्ठा आहेत त्याची माहिती घेऊ. त्यानंतर जसं जसं आवश्यक असेल तसा निर्णय घेऊ, असं वळसे-पाटील म्हणाले.
आयपीएस लॉबीवर अंकूश ठेवणार?
आयपीएस लॉबी सरकारविरोधात काम करत आहे, ते विरोधी पक्षांना माहिती देत आहे, त्यावर काय करणार? असा सवाल करण्यात आला. फडणवीस हे मुख्यमंत्री होते. तसेच गृहखात्याचा पदभार त्यांच्याकडे पाच वर्षे होता. त्यामुळे गृहखात्यातील अधिकारी त्यांच्या संपर्कात असणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांना माहिती मिळते. त्यातून कसा मार्ग काढायचा आणि कामात सुधारणा कशी होणार याबाबत विचार केला जाणार आहे, असं ते म्हणाले.
पोलिसांना घर, भरतीही करणार !
महिला आणि सामान्य नागरिकांना गृहविभागाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करणार आहे. त्याकरिता आजीमाजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणं, पोलिसांना घरं देणं या सर्व गोष्टींवर लक्ष देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
गुन्हे निवारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था !
कोण काय आरोप करत आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझा पारदर्शक कारभार करण्यावर भर असेल, असं सांगतानाच दैनंदिन दिवसांमध्ये छोटे-मोठे गुन्हे होत असतात. हे गुन्हे निपटून काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल असे त्यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण राज्यामध्ये पोलिस विभागात फेरफार होणार असल्याची चर्चा आता सूरू झाली आहे.
0 टिप्पण्या