आमदाराने दिला इशारा आणि सा.बां. विभाग लागली कामाला !



  • १४ फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे दिले होते आदेश !

कोरपना - राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक रस्त्यांची कामे मंजूर असून कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कामामध्ये दिरंगाई होत आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत कामे पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार सुभाष धोटे यांनी दिला होता. आमदाराच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने दुसऱ्याच दिवशी गडचांदूर येथील माणिकगड चौक ते संत जगनाडे महाराज चौक रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे माणिकगड चौक ते संत जगनाडे महाराज चौक रस्त्याच्या कामासंदर्भात यापूर्वी अनेक निवेदने संघटनांनी व राजकीय पुढाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती. कंत्राटदाराची जवळीक साधून आपले हित साध्य करणाऱ्या शासकीय अभियंत्यांनी या विधानसभा क्षेत्रात कामे रखडून राहिल्याने नागरिकांना या रस्त्यावरून त्रास होत होता अखेर आमदाराला आंदोलनाची धमकी द्यावी लागली ही फार गंभीर बाब आहे.

अर्धवट कामे करून ठेवल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. आमदार सुभाष धोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची दि. ०१ ला राजुरा येथे बैठक घेतली होती. त्वरित कामे पूर्ण न केल्यास स्वतः आंदोलन करण्याचा इशारा आमदारांनी अधिकाऱ्यांना दिला होता. कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांचा अंत पाहू नये कामे त्वरित पूर्ण करावी असेही त्यांनी म्हटले होते.

कामे दर्जेदार व्हावी !
विधानसभा क्षेत्रात सुरू असलेली सर्व रस्त्यांच्या कामांचा दर्जा उच्च असला पाहिजे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सतत कामांवर लक्ष ठेवून असावे. दर्जाहीन कामे झाल्यास संबंधितांना जबाबदार समजून कडक कारवाई करण्याचा इशाराही आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थितांना दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या