केंद्र सरकारकडून नियमांमध्ये सुधारणा
नवी दिल्ली : केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम मोठ्या प्रमाणावर बदलले आहेत. दंडही बदलला आहे. ड्रायव्हिंग लायसन नसतानाही लोक गाडी चालवत असतात. अनेकदा लोकांना लायसन काढतानाचे किचकट नियम, प्रक्रिया आदींमुळे लायसन काढता येत नाही. पत्त्याचे पुरावे नसतात तर काही वेळा लायसन काढतानाची चाचणी द्यावी लागते. आता यापुढे ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आरटीओत जाऊन चाचणी द्यायची गरज राहणार नाही. चाचणी न देताच लायसन मिळणार आहे.
केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन बनविण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. ही प्रक्रिया सोपी केली आहे. ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनुसार, आता आरटीओमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. हे नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये अडकून राहण्याची गरज नाही.
मात्र, यासाठी एक काम करावे लागणार आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओमधील चाचणीची वाट पाहावी लागणार नाही. कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी स्वत:ची नोंदणी करू शकता. त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल, अर्जदारांना त्या स्कूलकडून प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे अर्जदाराचा ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाईल. यासाठी मंत्रालयाने ड्रायव्हिंग स्कूलना काही अटी घातल्या आहेत. त्यात पात्र ठरणारी स्कूल आरटीओमध्ये न जाता देखील प्रमाणपत्र देणार आहेत.
0 टिप्पण्या