ढिगाऱ्याखाली दबून मृत पावलेल्या मारोती च्या मृत्यूस जबाबदार कोण?


ईरई नदीच्या पात्रात होत असलेल्या अवैध रेती तस्करीमुळे झाला मारोतीचा मृत्यू?

ढिगाऱ्याखाली दबून यापूर्वी झाला होता या ठिकाणी मृत्यू!

चंद्रपूर (वि.प्रति.)
सोमवार दिनांक 28 रोजी इरई नदीच्या काठावरील जमनजेट्टी परिसरात मारोती गेडाम या ४० वर्षिय मजुराचा ढिगाऱ्याखाली येऊन मृत्यू झाला. मागील अनेक वर्षापासून या ठिकाणाहून अवैधपणे रेतीची तस्करी केली जात आहे. अनेकदा या ठिकाणी थातुरमातुर कारवाया पण झालेल्या आहेत. तरी सुद्धा रेती तस्करांनी या ठिकाणाहून जोमाने रेती तस्करी सुरू ठेवली आहे. नुकतेच काही महिन्यापूर्वी चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः या ठिकाणी एकाचं वेळी रेती भरलेल्या ११ ट्रॅक्टर वर मोठी कारवाई केली होती. चंद्रपूर चे तहसीलदार गौड व त्यांच्या टिम ने असे धाडस कधिही दाखविले नाही, हा संशोधनाचा विषय आहे. महत्वाचे म्हणजे इरई नदीचे हे पात्र रेती तस्करांनी पूर्णपणे उपसून ठेवले असून या सत्यतेची वरिष्ठ शासकीय स्तरावर चौकशी करण्यात यावी व यातील दोषींवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केल्यास जिल्ह्यातील रेती तस्करीवर आळा बसू शकेल.

ईरई नदी व त्यातील रेती आमच्या बापाची, अधिकारी मात्र खिशात, जे घुगे साहेबांना जमते ते तहसिल विभागाला कां नाही ?

काही मोजक्या रेती तस्करांची जमनजेट्टी परिसरातील ईरई नदीच्या पात्रात मक्तेदारी सुरू आहे. ईरई नदी व त्यातील रेती आमच्या बापाची, अधिकारी आमच्या खिशातच आहेत असे खुलेआम बोलतात. चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांनी त्यांच्या विभागामार्फत काही महिन्यापूर्वी या ठिकाणी कारवाई करीत रेती ने भरलेले अकरा ट्रॅक्टर महसूल विभागात जमा केले होते. घुगे करू शकतात तर मग तहसीलदार निलेश गौड कां बरे नाही? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. मागील काही महिन्यापूर्वी एका तहसीलदाराला याच परिसरात एका रेती तस्कर बंधूंकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. तेच बंधू आज या रेती तस्करांचे संरक्षक असल्याचे सांगण्यात येते. दहा ते पंधरा रेती तस्करांची या ठिकाणी मक्तेदारी आहे. 3 जेसीबी व पंचवीस ते तीस ट्रॅक्टर लावून या ठिकाणी रोज हजारो ब्रास रेती चा उपसा केला जातो. उपसा केलेली ही रेती मुख्य मार्गाने डोहाळली जाते. रोजचा लाखो रुपयांचा महसूल व करोडो रुपयाची खनिज संपत्ती या स्थळावरून डोहाळली जात आहे. त्यावर कारवाई करण्याच्या ज्यांना अधिकार आहे तो तहसील विभाग या रेती तस्करांशी "सेट" आहे.

मारोती च्या मृत्यूची किंमत फक्त दीड लाख ?

अवैध रेती उत्खननामुळे आजपासून दहा-बारा वर्षांपूर्वी या स्थळावर ढिगाऱ्याखाली युवकाचा मृत्यू झाला होता. आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या दहावी-बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या या मुलाचा ढीगाऱ्याखाली मृत्युनंतर या परिसरात रेती उत्खननामुळे ढीगारा कोसळला, असे स्पष्ट झाले होते. त्यानंतर १० वर्षांनंतर आत्ता झालेला मारोती गेडाम च्या मृत्यू हा नपुंसक प्रशासकीय कामाबद्दल बरेचं काही सांगणारा आहे. मारोती गेडाम या मजुराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या मागणी संदर्भात त्याला बानकर नावाचे रेती तस्कर दीड लाख रुपये देण्यास तयार झाल्याचे ऐकण्यात येत आहे. एखाद्या कुटुंब प्रमुखाची किंमत शासनाचा महसुल बुडवून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या चोरांना दंड हा व्हायलाच हवा. मारुती गेडाम यांच्या अपघाती मृत्यू आहे, तो कसा काय झाला? याचा तपास पोलिसांनी अवश्य करायला हवा, सदर अपघाताची तक्रार प्रशासनाने करायला हवी?

ईरई नदीच्या खोलीकरणापुर्वी "त्या" रेती तस्करांवर व्हावी कारवाई !


इरई नदी ही चंद्रपूर शहरालगत असून सरासरी सात किलोमीटर ती शहराला समांतर वाहते. नदीचे पात्र रुंद झाल्यामुळे पावसाळ्यात अनेकदा पूर परिस्थिती निर्माण होते, ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने पहिल्या टप्प्यात तात्काळ उपाययोजना म्हणून नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू करावे, अशा सुचना वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ईरई नदीच्या खोलीकरणापूर्वी ईरई नदीपात्रातील जमनजेट्टी परिसरात अवैध रेती उत्खननासाठी झालेले खड्डे व नदीपात्राची तपासणी व्हावी, याकडे जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी व पालकमंत्री यांनी जिल्हा प्रशासनाला आदेश द्यावे व ज्यांच्यावर यापूर्वी या परिसरात रेती उत्खनना संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे व दंड वसूल करण्यात आले आहे, त्यांच्यावर विशेष कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. यासंदर्भात पत्रकार संघाच्या माध्यमातून पालकमंत्री, शहराचे आमदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या