- यापूर्वी ही झाले होते मजूरांचे मृत्यू !
- कुटुंबाला थोडी बहू आर्थिक मदत करून पुन्हा तस्करांनी केली रेती उपस्याला सुरूवात !
- दोन मजुरांच्या मृत्यूनंतर अधिकाऱ्यांच्या बिदागीत वाढ ?
चंद्रपूर (वि.प्रति.)
सोमवार दिनांक 28 रोजी इरई नदीच्या काठावरील जमनजेट्टी परिसरात मारोती गेडाम या ४० वर्षिय मजुराचा ढिगाऱ्याखाली येऊन मृत्यू झाला. या मजुराचा मृत्यू नंतर पत्रकारांनी झळकलेल्या बातम्यांमुळे प्रशासन जागी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु आज तीन दिवसाचा कालावधी लोटूनही यासंदर्भात कोणतीच तक्रार करण्यात आलेली नाही, त्यामुळे कोणतीही चौकशी अद्याप सुरू झाली नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यासंदर्भात तक्रार करेल कोण? हा अपघाती मृत्यू असे सांगितले जात आहे. परंतु हा अपघात घडला कशामुळे? नैसर्गिक आपत्तीमुळे हा अपघात घडला नाही ही बाब तेवढीच सत्य आहे. रेतीचा अवैध उपसा झाल्यामुळे मारोती गेडाम यांचा मृत्यू झाला. मजुरी करणाऱ्या मारोतीच्या कुटुंबाला थोडीशी आर्थिक मदत देऊन तात्पुरते या प्रकरणावर पांघरूण घालण्यात आले. यापूर्वीही याचं ठिकाणी अशाच प्रकारे दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे असे इथलेच मजूर सांगतात. शासकीय दप्तरी याची कोणतीही नोंद नव्हती त्यामुळे याला पुरावा नाही असे आता प्रशासन म्हणू शकतो. मारोती गेडाम याच्या मृत्यूनंतर याची प्रत्यक्ष चौकशी व्हायला हवी, परंतु प्रशासनातील काही बेईमान अधिकाऱ्यांची तशी मानसिकता नाही, असे घटना घडल्यानंतर चार दिवसांनंतर दिसत आहे.
एका ट्रॅक्टर मागे ४५ हजार, किती खरे, किती खोटे ?
प्रामाणिक व धाडसी अधिकाऱ्यांचे अभिनंदन !
मारोती गेडाम या मजुराचा मृत्यू हा या परिसरातील तिसरा मृत्यू आहे. यापूर्वी याच परिसरात अशा घटनेमुळे दोन मृत्यू झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन मृत्यूनंतर या परिसरातून वाटणी झालेल्या जागेतून रेती तस्कर (स्वतः:च्या बापाची समजून) रेती काढण्यासाठी एका ट्रॅक्टरमागे 45 हजार रुपयांची महिन्याकाठी बिदागी दिली जात असल्याचे वृत्त आहे. 13 ते 14 ट्रॅक्टर मालक वीस-पंचवीस ट्रॅक्टर मधून या परिसरातून रेती उपसा असतात. त्या हिशोबाने विचार केल्यास मजूर मृतकाच्या कुटुंबास मिळालेली रक्कम ही अत्यंत तोकडी आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने ज्या ठिकाणी मारोती गेडाम यांच्या मृत्यू झाला. या परिसरातून आत्तापर्यंत किती रेतीचा उपसा केला आहे. याची संबंधित विभागाच्या माध्यमातून प्रत्यक्ष चौकशी करून राष्ट्रीय संपत्तीचे झालेले नुकसान व पर्यावरणाचा ऱ्हास याची भरपाई करणे गरजेचे आहे. प्रशासनातील प्रामाणिक अधिकाऱ्यांचे यानिमित्ताने स्वागतच आहे. एका वर्षापूर्वी चंद्रपूर चे तहसीलदार निलेश गौड यांनी या परिसरातील रेती तस्करांवर आपला चांगलाच वचक बसवला होता. हरामाच्या पैशाने गब्बर झालेल्या रेती तस्करांनी त्यानंतर तहसील विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली होती आणि स्वतःचा वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तहसील विभागातील अधिकाऱ्यांचे पण झालेल्या धक्काबुक्की नंतर तहसील विभागाने कोणतीही मोठी कारवाई केल्याचे ऐकविण्यात येत नाही. नुकतेच चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांनी याच परिसरातून अकरा रेतीने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले व या परिसरात मोठ्या स्तरावर रेती तस्करी सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे. मारोती गेडाम यांच्या अपघाती मृत्युनंतर या प्रकरणाची शासकीय चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी आता या परिसरातील नागरिकांकडून होऊ लागली आहे.
0 टिप्पण्या