बहुआयामी व्यक्तिमत्व : डाॅ. वासुदेवजी गाडेगोणे (जन्मदिन अभिष्टचिंतन !)



मैत्र जीवाचे...!

प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. वासूदेवजी गाडेगोणे यांचा आज जन्मदिन! मृदू व शांत सुस्वभावी स्वभावाचे गाडेगोणे यांच्या जन्मदिनानिमित्त अॅड. जयंत एकनाथजी साळवे यांचा जन्मदिन विशेष लेख वाचकांसाठी....!

या गोष्टीला साधारणत: चौदा ते पंधरा वर्षे झाली असतील . आईच्या गुडघ्यामध्ये काहीतरी दुखणे भरले होते म्हणून तिला घेऊन डॉ. गाडेगोणे हॉस्पिटलमध्ये गेलो होतो . डॉ . गाडेगोणे यांचे दवाखान्यात समोर पेशंट बसण्यासाठी मोठा हॉल आहे . तेथे कम्पाउंडरचा टेबल आहे . समोरच असलेल्या खुर्चीवर बसून कम्पाउंडर नव्या पेशंटचे नाव टेबलवर असलेल्या रजिस्टरमध्ये नोंदवून घेत होता . त्यावेळी त्याचे खुर्चीच्या बाजूला असलेल्या एका बेंचवर एक वृद्ध स्त्री बसली होती . मला वाटले की तीदेखील कुणी पेशंट असेल म्हणून बसली असावी . त्यामुळे मी फारसे लक्ष दिले नाही .
थोड्या वेळाने जेव्हा आमचा नंबर आला तेव्हा आईला घेऊन मी डॉक्टर साहेबांच्या चेंबरमध्ये गेलो . आईची तपासणी झाल्यावर डॉक्टरसाहेबांना मी थोडं त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल विचारलं . तेव्हा डॉक्टर म्हणाले , " मी आज जो काही यशस्वी दिसतो तो माझ्या आई वडीलांमुळे आहे . व तेही विशेषकरून आईमुळे जास्त ." डॉक्टरसाहेब असं म्हणाले आणि त्यांनी आपल्या जवळची बेल दाबली . कंपाऊंडरला सांगितले की आईला बोलावून आण. तेवढ्यात एक वृद्ध स्त्री जी बाहेर हॉलमध्ये बसली होती ती डॉक्टरांच्या चेंबरमध्ये आली . मला तेव्हा समजले की आपण जिला पेशंट समजत होतो ती तर डॉक्टर साहेबांची आई होती . त्यांच्या आईने आम्हाला डॉक्टरांबद्दल कौतुकाने बरेच काही सांगितले . तेव्हा माझी खात्री झाली की गोंदिया जिल्ह्यातल्या माहूरकुडा नावाच्या छोट्याशा खेड्यातून आलेल्या या जिद्दी माणसाने आपल्या हुशारीच्या , आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तसेच आपल्या आईवडीलांच्या आशीर्वादाने केवढी मोठी प्रगती केली आहे !
आज चंद्रपुरातच नव्हे तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक निष्णात यशस्वी अस्थी शल्यविशारद म्हणून त्यांचे नाव घेतले जाते . त्यांनी आपली नाळ अजूनही मातीशीच जुळून असल्याचे सांगितले . याबाबत डॉक्टर आपली एक जुनी आठवण सांगताना म्हणाले की त्यांना जेव्हा एमबीबीएसचा प्रवेश निश्चित झाला असे माहीत झाले तेव्हा ते आपल्या शेतात मातीचे टोपले उचलत होते . डॉक्टरांचा मेडिकल प्रवेश निश्चित झाला होता . 1976 मध्ये ते आपल्या हुशारीच्या जोरावर एमबीबीएस झाले . 1980 मध्ये त्यांनी ऑर्थोपेडिक्स या विषयात तर 1982 मध्ये जनरल सर्जरीमध्ये एम. एस . केले . त्यानंतर डॉ . गाडेगोणे यांनी तीन चार वर्ष मेडिकल कॉलेज नागपूर येथे नोकरी केली . वैद्यकीय शिक्षण घेत असणार्या विद्यार्थ्यांना शिकविले . ते सेवाग्राम येथे देखील महात्मा गांधी वैद्यकीय संस्थेत सुमारे अडीच वर्षे प्राध्यापक होते . त्यानंतर ते चंद्रपूरला आले . चंद्रपूरला पाच ते सहा वर्ष सामान्य रुग्णालयात ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून त्यांनी नोकरी केली .
आज डॉक्टर साहेबांचे मूल रोडवर भव्य असे गाडेगोणे हॉस्पिटल उभे आहे . त्यामागे आहे त्यांची जिद्द , मेहनत आणि त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद . 1985 पासून त्यांनी आपले स्वत:चे रुग्णालय सुरू केले व अत्यंत यशस्वीपणे ते हे रुग्णालय चालवीत आहेत .
 त्यांना अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत . इटलीमधील सिकाॅट फेलोशिप , डॉ .  ए. के . तळवलकर बेस्ट साइंटिफिक पेपर अॅवॉर्ड , असे अनेक अवॉर्ड्स त्यांचे नावावर आहेत . अनेक कार्यशाळांमध्ये त्यांनी आपले प्रबंध यशस्वीपणे सादर केलेले आहेत . हे करत असतानाच ते आपले सामाजिक उत्तरदायित्व विसरलेले नाहीत . शहराच्या मध्यभागी असलेले संताजी सभागृह हे डॉ . गाडेगोणे यांच्या मेहनतीने उभे झालेले आहे हे कुणीही नाकारणार नाही . ते विवेकनगर सेवा समितीचे ट्रस्टी आहेत .  ग्रामीण भागांमध्ये विशेषत: शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या व्यक्तींसाठी जी वैद्यकीय शिबिरे घेतली जातात अशा अनेक शिबिरांमध्ये डॉ . गाडेगोणे यांनी आपली सेवा दिलेली आहे . चंद्रपुरात अनेक योग शिबिरांचेदेखील त्यांनी आयोजन केलेले आहे . अनेक संस्थांचे ते सदस्य आहेत . रोटरी क्लब , आयएमए या संस्थांच्या माध्यमातून ते आपली सेवा देतच असतात . संताजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा  त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे . ते महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत . त्यांनी अस्थी शल्यचिकित्सा या विषयावर लिहिलेले अनेक लेख  बऱ्याच वैद्यकीय  मासिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत . आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर हे एक चांगले वाचक देखील आहेत . असं हे डॉ . गाडेगोणे यांचं चतुरस्र व्यक्तिमत्त्व . ते हाडाचे डॉक्टर आहेत . हे जरी खरं असलं तरी ते खऱ्या अर्थानं  " हाडाचे डॉक्टर " आहेत हेच सत्य आहे . त्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पत्नी  सौ .  शुभांगी वहिनी यांची समर्थ साथ लाभली आहे .
आज डॉक्टर साहेबांचा वाढदिवस! त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा!


-अॅड. जयंत एकनाथराव साळवे,
बामणी, चंद्रपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या