आज्या पंज्यानं राकली
भात भाकरीची स्येती
आता उतार वयात
गेली पोराईच्या हाती
घाम गाळून मातीत
बाप पिकवाचा दाणे
पोटी आज निपजली
बीना चलनाची नाणे
वाड वडीलाची भेट
काऱ्या वानाची जिमीन
दारू सट्टयाच्या नादात
सप्पा टाकली इकून
नाई रगडली काया
अनकस्टी वारसानं
लक्ष्मी नांदाले आलेली
गेली आल्या पावलानं
नाई किस्यात दमडी
गुंडी लावाले कोटाले
सात सोडली मायेची
घास भेटेना पोटाले
नांव पुसले समदे
अंती सातबारा कोरा
गांवी झिंगत फिरते
हाती पकडून झोरा
✍️ श्री. अनिल आंबटकर, चंद्रपूर
0 टिप्पण्या