वैदर्भिय राजकारणातील शापित नायक-नरेशबाबु पुगलिया ! (जन्मदिन विशेष)


(जन्मदिन विशेष) 
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, माजी आमदार, माजी लोकसभा खासदार, माजी राज्यसभा खासदार आणि डॉ. दत्ता सामंत यांच्या तोडीचे दमदार कामगार पुढारी नरेश पुगलिया हे जन्माने क्षत्रिय, धर्माने जैन तर कर्माने सर्वधर्मिय आस्था ठेवणारे असून २० मे हा त्यांचा जन्म आर्वी (वर्धा) येथे झाला. जगप्रसिद्ध समाजसेवी बाबा आमटे, तेजस्विनी शोभाताई फडणविस (हिंगणघाट) यांचा जन्म ही वर्धा जिल्ह्यातीलच आहे. चंद्रपूर जिल्ह्यातूनच या त्रिमुर्ती ने आपआपल्या कर्तबगारीची मोहोर-नाममुद्रा उठविली आहे. त्यानिमीत्ताने वैदर्भिय राजकारणातील शापित नायक नरेशबाबु पूगलिया यांच्या कर्तबगारीचा बिनधास्त पण धावता परामर्ष....!



राजकारणाचा प्रारंभ झाला असतांनापासुन नरेशबाबु पूगलिया यांच्या समाजाभिमुख बाणेदार राहिला. त्यांचे वडील साधे सांसरिक जीवन जगले कारण ते त्यांची धार्मिक सत्शील प्रवृत्ती राखून होते. थोर स्वतंत्रता सेनानी आणि चंद्रपूर नगर परिषदेचे लोकप्रिय नगराध्यक्ष राहिलेले स्व. राजमलजी पुगलिया हे नरेशबाबुंचे आदर्श आणि प्रेरणास्थान ! तो उदात्त वारसा जपत जपतच त्यांनी समाजाभिमुख राजकारण प्रवासात युवक काँग्रेस जिल्ह्याध्यक्ष, काँग्रेस जिल्हाध्यक्ष, आमदार, लोकसभा खासदार, राज्यसभा खासदार, निरनिराळ्या सांसदीय समित्यांचे अध्यक्षपद याद्वारे लोकसेवा केली, जनप्रश्न सोडविले पण त्याच्या ते प्रेसनोट काढीत बसले नाहीत. हजारो लोकांना त्यांनी रोजगार दिला, रोजगार मिळूवन दिला पण त्याबद्दल एक अक्षर ही कधी त्यांच्या मुखातून निघाले नाही. अधिक उत्पादन करा, अधिक वेतन-भत्ते मिळवा या त्यांच्या कामगार धोरणामुळे ते उद्योगस्नेही कामगार हितचिंतक पुढारी ठरले. डॉ. दत्ता सामंत यांच्यानंतर महाराष्ट्रात दमखम असलेला एकमेव कामगार पुढारी म्हणजे नरेशबाबु पुगलिया ! स्व. शामबाबु वानखेडे, भाजपचे विधान परिषद आमदार मितेश भांगडिया, नरेशबाबु पुगलिया यांच्या राजकीय मांडवाखालून जावून राजकीय प्रगती साधणारे मुंबई-दिल्लीत गचाळ राजकारण करणारे उद्योगपति समर्थकांनी कामगार क्षेत्रांतुन संपविण्याच्या अनेक मोहिम आखल्या पण त्यात त्यांना अपयश आले. अवैध संपत्ती, दारू आणि महिला यांचे ज्याला व्यसन आहे तोच खरा पुढारी असे आजकालचे वातावरण अवस्था आहे पण नरेशबाबुंना त्या व्यसनांचा तिटकारा आहे. अन्य कोण्याही पुढाऱ्यांपेक्षा नरेशबाबुंना वरिष्ठ स्तरावर अधिक गांभीर्याने घेतले जाते. कारण त्यांचे कोणतेही लांडे कारभार किंवा तत्सम कामे नसतात. राजकारण-कामगार क्षेत्रात त्यांची रेषा लहान करण्याचे अनेक प्रयत्न झालेत पण ते सारेच्या सारे असफल झाले. ते "नरो वा कुंजरो" नाही स्पष्ट वागणारे-बोलणारे आहे. त्यांचा फटकळपणा-स्पष्टवादिता काही जणांना मुजोरी वाटते तो त्यांचा प्रश्न आहे. पाठीवर थाप आणि खालुन बोट असे त्यांना कधी जमलेच नाही. सर्व गुण-अवगुण संपन्न एक भोळा-बगळा आहे, त्याला काही भाटांनी स्थितप्रज्ञ ठरवून टाकले. नरेशबाबु बाप दाखव नाही तर श्राद्ध कर या कार्यशैलीमुळे नागरिकांत परिचित आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील (चंद्रपूर-गडचिरोली) लहान मोठे, असली-नकली काँग्रेस पुढारी इंका सोडून गेले तेंव्हा नरेशबाबुंनी स्वतःची व्युहरचना आणि बळावर ९ पैकी सात विधानसभा मतदार संघात नवख्यांना उमेदवारी देवून त्यांनी आमदारपदी निवडून आणले होते. स्वत:चा लोकसभेत पराभव झाला आणि केंद्रात काँग्रेसला बहुमत मिळाले तेंव्हा आल्या-गेल्यांना पेढे वाटत बसणारा अवलिया-वेडा नागरिकानी अनुभवला आहे. विजयाने मस्त होणे आणि पराजय-अपघाताने सुस्त होणे त्यांना मुळीच जमले नाही. गल्लीत गोंधळ आणि मुंबई-दिल्लीत मुजरा हे त्यांना मुळीच जमले नाही..आजोबा राजमलजी पुगलिया-इंदिरा गांधी हे त्यांचे आराध्यदैवत आणि प्रेरणास्थान! इंदिराजी गांधी, संजय गांधी, राजीव गांधी यांचे ते बिनीचे सहकारी !


ते "डुप्लीकेट काँग्रेसी आहेत, अराजकता थांबली नाही तर २५ नंतर आंदोलन!" - पुगलिया

मागील आठवड्यात नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषद घेवून महानगरात दारू, वाईन आणि बिअरची दुकाने नियमांना बगल देवून थाटली जात आहे. ही अराजकता आहे, ही थांबली पाहिजे, दारूबंदी उठावी म्हणून ज्यांनी प्रयत्न केले ते डुप्लिकेट कांग्रेसी आहेत, दारू विरोधात २५ मे नंतर आपण आंदोलन करणार असल्याचे जाहिर केले, त्यामुळे खळबळ माजली असुन यापूर्वी ही जिल्ह्यात सुरू असलेला अवैध कोळसा व्यापार, रेती व्यवसाय याला राजकीय वरदहस्त असुन त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी एका पत्रकाद्वारे मान. मुख्यमंत्री महोदयांना केली होती. जिल्ह्यातील कोळसा व्यवसायाची केंद्रीय चौकशी झाल्यास सर्वच काळेभेरे बाहेर येतील. अलिकडे राजकारण हा व्यवसाय झाल्यामुळे अनेकांचे ते उपजिवीकेचे माध्यम झाले आहे असा सर्वसाधारण समज आहे आणि त्यात तथ्य ही आहे, हे समजण्यालायक जनता शहाणी आहे. जिल्ह्यात दारू, अवैध कोळसा, रेती यात कोण असा प्रश्न एखाद्याला विचारला तर शेम्बडा पोरगा भी याचे उत्तर देईल हि स्थिती आहे.


नरेशबाबुविरुद्ध धादांत खोटे आरोप लावून त्यावेळी काढलेल्या हिंसक मोर्चाने ही ते डगमगले नाहीत. जीवघेण्या वाहन अपघातात पायाला जबरदस्त अपघात झाला असतांनाही काँग्रेस-कामगारांचे हा सर्किट बुवा काम करीत राहिला. स्व. सीताराम केसरी, स्व. वसंतराव साठे, वसंतदादा पाटील सारख्या मातबरांचे त्यांनी जनप्रश्नांवर रक्त आटवले, त्यांना घाम फोडायला लावला. ते दि एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत पण शिक्षण सम्राट मुळीच झाले नाही. त्यांच्या विधीमंडळ-सांसदीय कामगिरीचा आढावा घेणारे पुस्तक प्रकाशित व्हायला पाहिजे. दि कल्चरल सोसायटी प्रतिष्ठानाद्वारे ते गरजुंना सदैव मदत करीत असतात पण त्याची प्रसिद्धी टाळतात. आपल्या अटीवर समाजकारण, राजकारण, कामगार यांच्यासाठी काम करणाऱ्या नरेशबाबुंना काही नतद्रष्टांनी उचापतखोरांनी त्यांना मुजोर ठरवले असले तरी नरेशबाबुंना मानणारा वेगळा वर्ग आहे, त्यांच्या चाहत्यांची आणि प्रशंसकांची आज ही कमी नाही. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस उध्वस्त होण्यात उपद्व्यापी काँग्रेसीच जबाबदार आहे, हे ही तेवढेच सत्य आहे. जिल्ह्यातील डुप्लीकेट काँग्रेसी आणि अवैध धंद्यांना राजकीय संरक्षक असलेल्यांचा नरेशबाबु नक्कीच बुरखा फाडतील यात शंका नाही, नरेशबाबुंना आज २० मे या त्यांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा!

(साभार: साप्ता. विदर्भ आठवडी, चंद्रपूर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या