- देशी दारू दुकान रद्द करा : जगन्नाथबाबा नगर संयुक्त दारुबंदी समिती!
- स्मरणनिवेदनातून देशी दारू दुकान रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा राहुल पावडे यांचा इशारा !
चंद्रपूर : पावनभूमी व श्रद्धास्थान असलेल्या जगन्नाथ बाबा मठ परिसरातील देशी दारु व बिअर शॉपचे दुकान रद्द करावे, या प्रमुख मागणीसाठी जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारुबंदी समितीच्या माध्यमातून मागील 20 दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहे. परंतु, अद्यापही जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभाग याबाबत चकार शब्द बोलण्यास तयार नसून कुठलीही कायदेशीर कारवाई झाली नसल्याने आज दि. 10 मे रोजी जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारुबंदी समितीच्या नेतृत्वात माजी उपमहापौर राहुल पावडे व शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले. यासाठी हजारोच्या संख्येने महिलांचा सहभाग असून जिल्हाधिकारी यांना घेराव करण्यात आला.
चंद्रपूर शहरात विविध विकास कामांची मालिका सुरू आहे. अशातच संपूर्ण जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली होती. परंतु, महाविकास आघाडी सरकारने दारुबंदी उठवून जिल्ह्यात अराजकतेचे वातावरण निर्माण केले आहे. जगन्नाथ बाबा नगरातील देशी दारू व बिअर शॉपी दुकाने रद्द करावी, यासाठी नागरिकांनी एल्गार पुकारला आहे. जवळपास मागील 20 ते 25 दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदने देवून जनमत चाचणी व विद्यार्थ्यांकडून पोस्टकार्ड देण्यात आले. लक्षवेधी आंदोलनाच्या श्रृंखला चालवून प्रशासनाचे लक्ष वेधले. परंतु, कुंभकर्णी झोपेत असल्याचे दाखवून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. पुढे चालून येथे जनप्रक्षोभ भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीकोनातून या परिसरातील देशी दारु दुकान व बिअर शॉपी तातडीने बंद करावी, यासाठी जगन्नाथ बाबानगर संयुक्त दारुबंदी समितीच्या नेतृत्वात माजी उपमहापौर राहुल पावडे योगीता पाटील सुचिता ठेंगडे सविता कांमळे बंटी चौधरी दिलीप पुण्यपवार कैलास शेन्डे वासुदेव शात्रकार नामपलीवार नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी व दारूबंदी विभागास स्मरणपत्र देण्यात आले.
दरम्यान दोनदा राहुल पावडे यांच्या नेतृत्वात सदर सुरू झालेले दारू दुकान बंद करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून रामनगर पोलीस स्थानकातील ठाणेदार यांना प्रत्यक्ष घटना स्थळी बोलावून परिस्थितीचे अवलोकन करण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस विभागाने आपला अहवाल उत्पादन शुल्क विभागास पाठविला. व उत्पादन शुल्क विभागाने सुद्धा देशी दारू भट्टी बंद करण्या संदर्भात सकारात्मक बाजू व अहवाल ठेवण्याचे सर्व नागरिकां समोर आश्वासित केले होते मात्र उत्पादन शुल्क विभागाने त्यांचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला नाही. यात उत्पादन शुल्क अधिकारीचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याची शंका येत आहे. त्यामुळे राहुल पावडे यांनी प्रत्यक्ष उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांशी भ्रमण ध्वनी वर अहवाल ताबडतोब पाठविण्या बाबत दम दिला. त्यावर पोलीस विभागाने दिलेल्या अहवालावर व जगन्नाथ बाबा नगर येथील सद्य परिस्थितीनुसार लवकरात लवकर अहवाल जिल्हाधिकारीना पाठवू असे उत्तर उत्पादन शुल्क विभागाने दिले आहे.
लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालय व उत्पादन शुल्क कार्यालाने यावर ठोस पावलं न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही राहुल पावड़े यांच्या नेतृत्वात जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारुबंदी समितीने दिला आहे.
0 टिप्पण्या