'मी आता येऊ शकत नाही...!"
वेळ आता बरोबर आठवत नाही, त्यावेळी कॉम्प्युटर नव्हते, खिळे जोडून वृत्तपत्र निघायचे, महत्वाचे म्हणजे प्रादेशिक वर्तमानपत्राच्या जिल्हा आवृत्ताची त्यावेळी पद्धत नव्हती. स्थानिक वर्तमानपत्र खिळे जोडुन ट्रेडल मशिनवर छापली जायची. मी कम्पोझिटर म्हणुन वृत्तपत्राचे काम करायचो. गंज वार्डामध्ये अशोक चंदेल यांचे शक्ति प्रिंटर्स मध्ये अनेक साप्ताहिक व दैनिक वृत्तपत्राचे त्यावेळी काम चालायचे. पुष्पकसे कम्पोझिटर काम करायचे. वृत्तपत्रात काम करीत असल्यामुळे सुरेश धोपटे हे नांव ऐकण्यात आले होते. परंतु कधी बघण्याच्या प्रसंग आला नव्हता. एके दिवशी सगळ्यांना रात्रपाळीत थांबवयाचे आहे. उद्याला एक अंक प्रिंटींग करून देणे आहे, असा मेसेज आला. चंद्रपूरच्या एका नविन झालेल्या बार अॅन्ड रेस्टारंट मध्ये दोन एकाचं पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच मारझोड झाली होती. त्या नेत्यांची वरात काढणारा व "त्या" पक्षांच्या नेत्यांची "आरती" उतरविणारा तो विशेष अंक होता. लिगल साईजच्या पेपरवर सुंदर हस्ताक्षरात कॉंग्रेसच्या त्या दोन्ही नेत्यांच्या माज उतरविणाऱ्या सुरेश धोपटे संपादित "चंद्रपूर पत्रिका च्या विशेष अंकाचे रात्रभर काम चालले. पाच कॉलमच्या एका पानाचे कम्पोझिंगसाठी पाच ते सहा तास लागायचे. रात्रभर चाललेल्या त्या कामात सुरेश धोपटे प्रत्येक दोन तासानंतर यायचे, आणि कामगारांना नाश्त्यांसाठी वगैरे विचारपूस करायचे. (सुरेश धोपटे यांना प्रत्यक्ष बघण्याची ही माझी पहिलीचं वेळ ! लांब-लचक, आकर्षक, डोक्यावर टक्कल अन् वाढलेली दाढी आणि आकर्षक, दरारा निर्माण करणारे एकंदर कदकाठी असे त्याचे आकर्षक व्यक्तीमत्व होते.) कुठे कोणत्या कॉलम मध्ये काही मेटर कमी आहे का? याची विचारपूस करायचे. (आत्तासारखी फांट बदलविणे किंवा जागा अॅडजस्ट करण्याची तेंव्हा व्यवस्था नव्हती.) चार ओळी कमी आहे असे एखाद्याने सांगीतले तर त्याच वेळी त्या चार ओळी लिहून द्यायचे आणि महत्वाचे म्हणजे चार ओळीत किती शब्द लागतात, तेवढेच लिहुन दिले जायचे. पहाटे चार वाजता अंकाचे आतील दोन व पाच वाजता बाहेरील दोन पान तयार झाले आणि पाच वाजता अंक प्रिंटींगला लागला. सकाळी सात वाजेदरम्यान तो अंक प्रिंटींग होऊन तयार झाला. त्यानंतर एका हातरिक्षावर तो अंक टाकून प्रेस मधून पुर्ण रक्कम देवून, सूरेश धोपटे घेऊन गेले. त्यानंतर सायंकाळी त्यावेळचे राज्यपाल पि.सी. अलेक्झांडर यांचा चंद्रपूरला दौरा होता. त्या कार्यक्रमात तो अंक मंचावर स्वतः सुरेश धोपटे यांनी वितरीत केला. त्यावेळी चंद्रपूर शहरात काँग्रेसचे फार मोठे वजन होते. अनेक वजनदार नेते त्याठिकाणी उपस्थित होते. त्यातील दोन वजनदार नेत्यांच्या वाभाडे काढणारा तो अंक चंद्रपूर शहरात पुर्णपणे वाटला गेला होता, तो सुद्धा सुरेश धोपटे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ! एखाद्या संपादकाने कोणाबद्दल लिहावे आणि त्याला स्वतः तो अंक वितरीत करावा ही हिम्मत होती ती फक्त सुरेश धोपटे यांच्यामध्येच ! स्वतःचे साप्ताहिक वर्तमान पत्र खिशात किंवा गाडीच्या डीक्कीत लपवून मोजक्याच लोकांपर्यंत देणारे अनेक महाभाग संपादक आज बघायला मिळतात. परंतू जास्तीत जास्त प्रतित अंक काढून ते वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आटोकाट प्रयत्न सूरेशकाका धोपटे यांचा रहायचा. चंद्रपुर पत्रिका मध्ये आज कुणाला धुतले हे वाचण्यासाठी वाचक अंकाची वाचक प्रतिक्षा करतात, असा एकमेव अंक सूरेश धोपटे यांचा "चंद्रपूर पत्रिका" हाच रहायचा. जिल्ह्यातील अनेक नेत्याचे वाभाडे काढणारे अंक त्यांनी प्रकाशित केले आणि त्यांच्याविरोधात आहे त्यांच्यापर्यंत स्वतः: न भिता पोहोचविले, हे त्यांना जमले. आकस, स्वार्थापोटी किंवा राग म्हणून त्यांनी कधीच केले नाही. वास्तव जनतेसमोर यावे, चुकांमध्ये सुधारणा व्हावी, वृत्तपत्र समाजाचा आरसा आहे, हे दाखविण्याचे कार्य त्यांनी "चंद्रपूर पत्रिका" च्या माध्यमातून केले. त्यांच्याविरोधात लिहीले, त्यांनी "ब्र" काढायची हिम्मत कुणामध्ये नव्हती. एवढा दरारा असलेला पत्रकार मी तरी चंद्रपूरात बघितला नाही. नेता, कार्यकर्ता कितीही मोठा असो जोपावेतो पत्रकार त्याला त्याचा खरा चेहरा दाखवित नाही आणि तो नेता ते मान्य करीत नाही. तोपर्यंत तो नेता असतो. असे त्यांचे स्पष्ट मत होते.
त्यानंतर मी माझे घरी काम्प्युटर घेऊन डीटीपी जॉब वर्क टाकले. माझे कडे ही बहुतेक चंद्रपूरच्या साप्ताहिक वृत्तपत्राचेचं कार्य चालायचे आणि ते माझे उदरनिर्वाहाचे साधन होते. त्यानंतर कितीतरी वर्षानंतर सुरेश धोपटे हे माझे घरी आले, त्यांना "चंद्रपूर पत्रिका' चा अंक काढायचा होता. ते घरी आले म्हणुन धडकी ही भरली होती. लिफाफ्यात मेटर आणि त्या अंकाच्या किंमतीपेक्षा १०० रू.. जास्त असे त्यांनी दिले, जास्तीचे शंभर नको ही म्हणायची हिंमत ही जुटली नाही. त्यानंतर नेहमीचं सुरेश घोपटे यांचे घरी अंकानिमीत येणे-जाणे व्हायचे, पत्रकार सुरेश धोपटे चे कधी धोपटे काका झाले आणि कधी घरच्या मुलांचे ते लाडके झाले कळाले नाही. जितका लेखणीमध्ये पाषाण, ताढर तेवढाचं हळवा असा हा स्पष्ट माणुस ! इतक्या वर्षापासुन वृत्तपत्र आणि या क्षेत्राशी जुळला असल्यामुळे टायपिंग व कम्पोझिंग करीत असल्यामुळे थोडे बरं लिहायला यायचे, असे वाटायला लागल्यावर आपले ही एखादे वृत्तपत्र असावे असे वाटले. सगळ्यात पुर्वी काकांना वृत्तपत्र काढतोय असे सांगीतले. दोन-तिन सल्ले मिळाले. "तुला वाटते तर काढ पण अवास्तव कुणाची प्रशंसा करू नको, दिखावा, फालतु नेत्यांच्या नादी लागु नको. जे दिसते ते लिहायचे काय होईल ते नंतर बघायचे. लिहायचे पुर्वी विचार करायचा. लिहिल्यानंतर येणाऱ्या प्रसंगांशी दोन हात करायची पुर्वी तयारी करायची त्यानंतर अंक काढायचे. प्रशंसा करणारेचं सर्वात धोकादायक असतात. त्यांचेपासुन सावध रहा." असे अनेक सल्ले मिळाले. स्वत:चे "आठवडी विदर्भ" नावाचे साप्ताहिक काढले. धोपटे काकांच्या स्टाईलने काढण्याचा प्रयत्न केला त्यात अपयशी ठरलो. ते साप्ताहिक नंतर रद्द झाले. आता "विदर्भ आठवडी" नावाचे एक साप्ताहिक कधी-कधी प्रकाशित होते. त्यांनी दिलेल्या सल्ल्याला, गुरू मंत्राला बहुतेक कानाडोळा केला, त्यामुळे साप्ताहिक काढण्यात अपयशी ठरलो ही असेल, परंतु काकांसोबत फार मोठा काळ जवळ राहण्याची संधी मिळाली. बरेचंकाही शिकायला, बघायला मिळाले. "झुकेगा नहीं साला!" आजचा हा प्रसिद्ध डायलाॉग, त्यावेळच्या सूरेशकाका धोपटे यांचेवर अगदी तंतोतंत जुळणारा आहे. दुसरे सुरेश धोपटे होणे नाही, हे ही तेवढेच निश्चित ! आपल्याला धारदार लेखणीने अनेकांना घायाळ करणाऱ्या धोपटे काकांच्या लेखणीने घायाळ झालेल्यांनी त्यांना पडद्यामागे राहून त्रासही दिला, लेखणी सलामत असेपर्यंत कुणी त्यांचा केसालाही धक्का लावू शकले नाही. त्यांचे अनेक अंक आज माझ्या संगणकात संग्रही आहेत.
२००९-१० च्या दरम्यान राष्ट्रीय युवा संगठन नई दिल्ली, चंद्रपूर जिल्हा शाखेने सुरेश धोपटे, बंडू धोतरे यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्यावेळी "सत्कार कर्तृत्वाचा' या पुस्तकाचे मी प्रकाशन केले होते. त्यावेळी सांगावेसे वाटते या सदरात सुरेश धोपटे यांनी आणि आजच्या पत्रकारांविषयी लिहीलेल्या गोष्टी या आज तंतोतंत जुळणाऱ्या आहेत. त्यातील काही अंश "आमच्या पिढीतल्या पत्रकारांपेक्षा आजच्या काळातील पत्रकाराजवळ अनेक साधने आहेत. एकाग्रता, अभ्यास, नम्रतेचा अभाव असला तरी आपण सर्वज्ञ, बाहुबली असल्याचा समज जास्त आहे. आपली खरी खुरी मिळकतीपेक्षा आपले रहान सहान मोठे कसे ? याचे आत्मचिंतन करायला हवे. मठाधिश, डॉन किंवा चमचे बनू नका. अभ्यास वाहवा. कुटाळक्या टाळा. अभ्यास, कठोर परिश्रम, ध्वेवनिष्ठतेला दुसरा पर्याय नाही." याचा बहुतेक आज आम्ही जागलो नाही. म्हणून काही अनामिक गोष्टींना आज सामोर जावे लागत आहे.
दोन महिन्यांपूर्वी एका छोटयाशा अपघातानंतर लकव्याचे सौम्य लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी मला सांगीतल्यानंतर दुसरेच दिवशी काकांची लहान मुलगी निशा धवड (धोपटे) यांनी मला भ्रमणध्वनीवरून फोन केला, काकांचा संदेश दिला. निश्चिंत रहा, मी आता येवू शकत नाही. बरा हो. आणि पुन्हा कामाला लाग." असा दिलेला संदेश हा माझेसाठी येऊ शकणार नाही पण कधीही भेटणार नाही. असा होईल असा मला कधीही वाटले नाही. पैसे आणि वयाचे सोंग करता येत नाही, आज ही गोष्ट माझेबाबतीत सत्य ठरली आहे काका !
दुसरा सूरेश धोपटे होणे नाही हेच यानिमीत्ताने सांगणे. आज सुरेशकाका धोपटे अनंतात विलीन होत आहे, साप्ता. विदर्भ आठवडी व बिट्टुरवार परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली !
राजु बिट्टूरवार, चंद्रपूर
0 टिप्पण्या