बंदी असलेला सुगंधित तंबाखु विक्री, रेती तस्करी, कोळसा चोरी, ऑनलाईन सट्टा, जिल्हा पोलिसांचे नियंत्रण की ‘सेटींग' !
जिवघेणी मारझोड च्या प्रकारात मोठी वाढ !
चंद्रपूर (वि.प्रति.)
नुकताच २६ जून रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन पाळला गेला. नागपुर पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेने या विरोधात विशेष मोहिम राबविली. परंतु चंद्रपूरात असे काही होतांना दिसले नाही. मागील अनेक वर्षापासुन बंदी असलेला सुगंधित तंबाखु जिल्ह्यात आज ही खुले आम विकल्या जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला सुचना देवुन एखादी कारवाई केल्याचे कुठेतरी वाचण्यात येते. काही महिन्यांपुर्वी वृत्तपत्रामध्ये बंदी असलेला सुगंधित तंबाखु विक्रेत्यांवर व त्यांच्या गोडाऊनवर मोठ्या कारवाया पोलिस विभागातर्फे करण्यात आल्या होत्या. ज्या मोठ्या तंबाखु विक्रेत्यांवर या कारवाया करण्यात आल्या त्यांनी या व्यवसायाला पूर्णपणे बंद केले की पोलिसांशी संगनमत करून ‘परवानगी' ने हा व्यवसाय सुरू आहे, याचे संशोधन व्हायला हवे. नुकतेच तिन-चार दिवसांपूर्वी बल्लारपूर रोडवर पोलिसांना मिळालेल्या गुप्त सुचनेच्या आधारावर सुगंधित तंबाखुच्या गाडीवर कारवाई करण्यात आली होती. ५ लाखाच्या जवळपास सुगंधित तंबाखू पोलिसांनी अन्न व प्रशासन विभागाला सुचना देवुन त्यांच्या स्वाधिन केला. राजुरा हे सुगंधित तंबाखु चे हब बनले आहे, परंतु त्याकडे पोलिसांचे तपास अधिकारी, कारवाई करणारे अधिकारी यांना चांगल्या प्रकारे माहित आहे. या व्यवसायात आज ही जुनेचं मोहरे कार्यरत आहेत. फक्त त्यांना कारवाई न करण्यासाठी ‘परमिशन' देण्यात आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार वसिम' याचा घाऊक व्यापाऱ्यापर्यंत पोहोचणारा हा सुगंधित तंबाखु होता. तो तंबाखु कुठून आला, कुठे जात होता आणि कुणाचा होता आता याचा तपास घेणार कोण ? हीच स्थिती आज सर्वचं अवैध व्यवसायाची आहे.
पुर्वी कागदावर खेळण्यात येणारा सट्टा व्यवसाय आता ऑनलाईन झाला असुन जिल्ह्यात अनेक जण हा व्यवसाय पोलिसांच्या परवानगी' ने खुले आम करीत आहे. एकट्या चंद्रपूर शहराच्या हद्दीत २८-३० जण हा व्यवसाय करीत असल्याचे सांगण्यात येते. करोडो-लाखो रूपयांचा हा जुव्वा गरीब शौकीन खेळत असतात. यासाठी त्या-त्या पोलिस स्टेशन ला बांधले जाते. त्यांची मर्यादा बांधली जाते. त्यासाठी त्या-त्या पोलिस स्टेशन च्या अधिकाऱ्यांना त्यांचा 'हप्ता’ पोहोचविला जातो. त्यासाठी वेगळे नियुक्त केलेले ‘सिव्हील ड्रेस कोड' फिरणारे 'वसुली अधिकारी' तोंडी नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यातील स्थिती विचारात घेतली तर पोलिसांनी याला आपला ‘पोट भरण्याचा व्यवसाय बनविला आहे. चंद्रपूर शहरातील एका पोलिस स्टेशन चा ठाणेदार शहराच्या मुख्य मार्गावर आपला मोठा हॉटेल व्यवसाय उभा करीत आहे. स्वतःला प्रामाणिक व देशसेवा करणारा अशी त्याची प्रतिभा उभी करण्यात आली आहे. मुख्य मार्गावर उभे होणारे हे रेस्टारंट ऑनलाईन सट्टा व्यावसायिकांच्या पैशावर उभे राहत आहे. त्याचाच हद्दीत सगळ्यात जास्त सट्टा व्यावसायिक आहेत. पोलिसांनी त्यांची बिदागी द्यायची आणि खुले आम व्यवसाय करायचा असा प्रकार आज चंद्रपूर जिल्ह्यात खुले आम सुरू आहे.
'चोर-चोर मौसेरे भाई' असा हा खेळ आहे. रेती चोरी, कोळसा चोरी थांबावी यासाठी शासनाने विविध विभागास मदत व्हावी यासाठी पोलिसांना काही विशेष अधिकार देण्यात आले आहे. परंतु चोरांची यादी बनवून त्यांचेकडून महिन्याची ‘वसुली' घ्यायची असा धंदा आज जिल्ह्यात खुले आम सुरू आहे. याला राजकीय वरदहस्त प्राप्त आहे, यात ही काही शंका नाही. निव्वळ 'माया' जमविण्यासाठी राजकारणात आलेले काही राजकारण्यांचा आपल्या चेले-चपाट्यांना असलेला आशिर्वाद शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात प्रामाणिक अधिकाऱ्यांना बाधा निर्माण करीत आहे. यावर रोख लागायला हवी. नुकत्याच २८ मे २०२२ रोजी रेती/वाळु निर्गती धोरणानुसार रेती तस्करी रोखण्यासाठी पोलिसांना विशेष अधिकार दिले आहेत. परंतु काही पोलिस अधिकाऱ्यांनी आपआपल्या क्षेत्रात रेती तस्करांकडून वसुली ची मोहिम राबविण्यासाठी स्वतः काही अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे. ही भयावह स्थिती कुठे तरी नियंत्रणात यायला हवी. काही जणांना सोबत घ्यायचे आपले चांगले दाखवायचे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवायचे अशा अधिकाऱ्यांवर व त्यांच्या 'वसुली अधिकाऱ्यांवर' प्रामाणिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून त्यांची उचलबांगडी करणे गरजेचे आहे. या अवैध व्यवसायातुन मिळणारा अमाप पैसा व त्यातुन पोलिसांशी झालेले 'अर्थ'पुर्ण संबंध यातुन जिवघेण्या मारहाणीचे प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारी सांगते परंतु प्रकरणाची तक्रार होवू न देता आपसी समझौता करून प्रकरण दडपण्याचे कार्य करून ‘खलनिग्रहाय सद्क्षणाय'या ब्रिदाचा विसर पडणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यकर्त्यांपासुन तर प्रामाणिक अधिकाऱ्यापर्यंत सजग राहणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पुष्कळ पैसा आहे, असे काही अधिकारी खाजगी मध्ये चर्चा ही करीत असतात. चुकीचा व्यवसाय करीत असाल तर आमचा वाटा दिल्याशिवाय नाही, असे खुले आम काही भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांकडून खुले आम सांगीतल्या जात आहे. 'तुम्ही तुमचे चालु ठेवा आम्ही आमचे चालु ठेवतो' असा उपक्रमचं जिल्ह्यात राबविला जात आहे.
पोलिस विभागाने जाहिर केलेले क्रमांकाची यादी सार्वजनिक करण्यात येत आहे, लावा फोन आणि बघा !
0 टिप्पण्या