जिल्ह्यात नियमांना धाब्यावर बसवुन होतेय रेतीचे उत्खनन व उपस्याचा साठा ! In the district, the rules are being violated, sand mining and subsoil storage!




चंद्रपूर (वि.प्रति.) : सोमवार दि. ३० जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी मुरूगानंथम एम. यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकुन घुग्घूस येथील वर्धा नदी पात्रातुन मोटार बोटीद्वारे रेतीचे अवैध उत्खनन होतांना धडाकेबाज कारवाई केली. घुग्घूस येथील मे. जावेद ट्रेडर्स यांनी घुग्घूस येथील नकोडा हा रेती घाट सन २०२२ - २३ मध्ये ३,८८७ ब्रास रेतीचा शासकीय नियमांप्रमाणे उपसा करण्यासाठी लिलावात घेतला होता. रेती उत्खननासंदर्भात २८ जानेवारी २०२२ रोजी च्या शासन निर्णयाप्रमाणे अटी व शर्ती ची तरतुदी करण्यात आल्या आहेत. परंतु या अटी व शर्तींना धाब्यावर बसवुन रेती तस्करांकडून रेती उत्खनन होत असते. ज्या ठिकाणी रेती घाट मंजुर झालेला आहे, त्या गावातील सरपंच, गावस्तरीय समिती, जिल्हास्तरीय समिती तसेच तलाठी, पटवारी यांनी रेती घाट मंजुर झाला त्याठिकाणची रोजनिशी तपासुन उत्खनन नियमाप्रमाणे होत आहे की कसे काय ? याची पाहणी करणे गरजेचे आहे. चुकीचे आढळल्यास त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याची सुद्धा या नियमात निर्देश दिलेले आहेत. परंतु आर्थिक व्यवहारातुन तसे होतांना दिसत नाही. त्यामुळे लालसेपोटी अवैध रेती उत्खननाचे प्रकारात वाढ होत असतांना बघायला मिळते. दंडात्मक कारवाईमधुन रेती तस्करांवर वचक बसविण्यात प्रशासनाला म्हणावे तसे यश मिळत नाही. काही मोजकेचं कंत्राटदार रेती व्यवसायात कार्यरत आहेत आणि गब्बर-मुजोर होऊन बसले आहेत. अवैध रेती तस्करीमधुन पर्यावरणाचा होणारा ऱ्हास याकडे या मुजोरांचे दुर्लक्ष होत आहे. या रेती तस्करांना असलेला राजकीय वरदहस्त हा ही यासाठी तेवढाचं कारणीभुत आहे.

वाळु तस्करी तालुका स्तरीय समिती'चा कारभार मालसुताऊ?

https://www.vidarbhaathawadi.in/2022/06/sand-smuggle.html

स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे 'कर्तव्या'कडे दुर्लक्ष !

ज्यांचेवर स्थानिकरित्या पाहणी - कर्तव्य करण्याची जबाबदारी आहे ते अधिकारी-कर्मचारी यांचे आपल्या कर्तव्याकडे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्षामुळे रेती तस्करीवर नियंत्रणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे, ही शोकांतिका आहे. घुग्घूस येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात झालेली कारवाई याचेच उदाहरण आहे. रेतीच्या उपस्याप्रमाणेचं रेतीचा साठा यावर ही लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.

मोरवा येथील तो रेती साठा ?

शहरातील बाहेरील काही ठिकाणी रेती साठा असलेला अनेकदा बघण्यात आला आहे. रेती कंत्राटदारांकडून रेती साठा करतांना तो ज्या ठिकाणी करण्यात येत आहे याची त्याची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. परंतु तसे न करता अवैध रेती साठा खुल्या जागांवर साठविण्यात येतो. मोरवा येथे मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा नेहमीच बघायला मिळतो. एका राजकीय पुढाऱ्याच्या चमच्याचे हे 'रेती - हब' असल्याचे सांगण्यात येते. अशा रेती साठ्यावर स्थानिक कर्मचारी केंव्हा कारवाई करतील, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अवैध रेती उत्खननावर उपविभागीय अधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई !


घुग्गुस शहरालगतच्या वर्धा नदी पात्रामध्ये अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची तक्रारीनंतर प्राप्त झाली. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नकोडा घाट या ठिकाणी ३० जानेवारी रोजी धाड टाकली असता त्याठिकाणी एका मोटर बोटद्वारे अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळले. तसेच डब्ल्यू. सी. एल.च्या जागेवरून सदर रेती घाटावर जाण्याकरीता रॅम्प तयार करून नदीतून अवैध रेती उत्खनन सुरू होते जवळच लागून असलेल्या डब्लू.सी.एल.च्या मालकीच्या सर्व्हे नंबर ५६ मध्ये एक जेसीबी, एक पोकलेन मशीन व अंदाजे ४० ब्रास रेती साठा आढळून आला. या अवैध उत्खननामध्ये गुंतलेली सर्व वाहने व साहित्य जप्त करण्यात आले असून सदर वाहनांच्या मालकावर व अवैध रेतीसाठा केलेल्या संबंधितावर प्रशासनाद्वारे नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या