करंगळी व मानव...! Humanity is still alive.




एकदा आम्ही रेल्वेनं दिल्लीला निघालो होतो, तेव्हाच हा प्रसंग आहे. आम्हाला आमच्या मोठ्या मुलीकडं जायचं होतं. तेव्हा मायनिंग इंजिनिअर असलेल्या माझ्या जावयाची बदली हिमाचल प्रदेशमधील दारलाघाट येथे झाली होती. दिल्ली स्टेशनहून पुढं आम्ही जाणार होतो.
सेकंड एसीच्या डब्यात एका खालच्या बर्थवर मी आणि दुसर्‍यावर पत्नी झोपलेली होती. तिच्या अंगावर दागिने होते आणि जवळ पर्स होती. स्टेशनच्या अलिकडे असलेल्या जंगलातून रेल्वे सुसाट धावत होती आणि बाहेर पाऊस पडत होता. तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती. अचानक माझ्या पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आला. ती झोपेत असताना चोरानं तिच्या अंगावरचे दागिने ओढून घेतले होते, त्यानं पर्सही हिसकावली आणि तो दाराच्या दिशेने पळाला. आमचं बर्थ दरवाजाजवळच होतं. मी तसा झोपेतही सावधच होतो. पत्नीच्या आवाजाबरोबर मी जागा झालो आणि काय झालं याचा क्षणात मला अंदाज आला. त्याचवेळेस वीस-बावीसचा एक किडकिडीत तरुण दरवाजाच्या दिशेनं पळताना मी पाहिलं. चपळाईनं मी त्याच्यामागे धावलो. तो गाडीखाली उडी टाकणार, तेवढ्यात मी त्याची कॉलर पकडली आणि त्याच्याशी झटापट सुरू केली. एका हातानं मी डब्यातील दरवाजाची दांडी घट्ट धरून ठेवली होती, तर दुसऱ्यानं त्याची कॉलर, तो दरवाजाबाहेर पहिल्या पायरीवर उभा होता. त्याच्या एका काखेत चोरलेली पर्स होती. सुमारे पंधरा मिनिटे तो माझ्याशी झटापट करत होता. तो बारीक असला, तरी तरुण असल्यानं त्याची ताकद माझ्यावर भारी पडत होती. एक क्षण असा आला की मी सावध नसतो, तर त्याच्या हाताच्या हिसक्यानं मी धावत्या रेल्वेत दरवाजाबाहेर फेकला गेलो असतो. पण मला नशीबाची साथ मिळाली. मी सुखरूप राहिलो. दरम्यान आमचा आवाज ऐकून बोगीतील सहप्रवासी मदतीला धावून आले. पण तोपर्यंत माझ्या हाताला झटका देऊन चोरानं कॉलर सोडविली आणि धावत्या रेल्वेतून थेट अंधारात असलेल्या जंगलात त्यानं उडी मारली. आमचा ऐवज गेला, पण मी मात्र खाली पडण्यापासून बचावलो. दरम्यान पोलिसही त्या डब्यात आले. तोपर्यंत झांशी स्टेशनवर रेल्वे पोहोचली होती. पोलिसांनी आमची विचारपूस करून आम्हाला तक्रार नोंदविण्यास सांगितलं. पण त्यासाठी आम्हाला आमची रेल्वे सोडून देऊन तिथं थांबावं लागणार होतं. माझा पुढचा कार्यक्रम ठरलेला असल्यानं मी थांबण्यास नकार दिला आणि तुम्हीच काय ती तक्रार नोंदवा असं सांगून पुन्हा प्रवास सुरू केला.
दरम्यान सकाळी आम्ही दिल्लीला पोहोचलो. आम्हाला नेण्यासाठी आमच्या ओळखीचा ड्रायव्हर त्याचं नावं मानव तेथे आला होता. मानवची आणि आमची ओळख यापूर्वीच्या राजस्थानच्या प्रवासात झालेली होती. ज्या पर्यटन कंपनीमार्फत आम्ही सहल केली, त्यांनी मानवला आमच्यासोबत दिलं होतं. त्या प्रवासात त्यानं आम्हा दोघांची अगदी स्वत:च्या आई-वडिलांप्रमाणं काळजी घेतली. त्यामुळं साहजिकच सहल संपल्यानंतरही आम्ही फोनद्वारे एकमेकांच्या संपर्कात होतो. म्हणूनच आता हिमाचलला जाण्यासाठी त्याला मोठ्या विश्वासानं आम्ही बोलावलं होतं. दिल्ली स्टेशनवर तो आला, तेव्हा त्यानं आमचे पडलेले चेहरे पाहिले. काय झालं? म्हणून त्यानं नेहमीच्या आपुलकीनं चौकशी केल्यावर आम्ही त्याला चोरीची घटना सांगितली. 
त्यावर त्यानं आम्हाला त्याच्या टॅक्सीत बसवलं आणि काहीही न बोलता गाडी थेट त्याच्या घराकडे वळवली. तो दिल्लीतील एक झोपडपट्टीसारखा भाग होता. तिथंच त्याचं लहानसं घर होतं. तुला कशाला त्रास? असं आम्ही म्हणत असतानाही त्यानं आम्हाला घरात नेलं. तिथं त्याच्या आई-वडिलांनी आमची आस्थेनं चौकशी केली. तिथंच आम्ही सकाळची आन्हिकं आवरली. तोपर्यंत आमच्यासाठी गरमागरम नाश्ता त्यांनी तयार केला होता. तो खाऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. निघताना मानवनं माझ्या हातावर एक लठ्ठ पाकीट ठेवलं? मला कळेचना की हे कशासाठी? उघडून पाहिलं तर त्यात दहा हजार रुपये होते. मी म्हणालो की हे कशासाठी? त्यावर तो म्हणाला की तुम्ही अशा परक्या मुलखात आहात, तुमच्या सभ्यतेचा मी अनुभवी आहे,त्यात तुमचे पैसे चोरीला गेले, तेव्हा नाही म्हणू नका, ठेवून घ्या. खरं तर पत्नीची पर्स आणि त्यातील पैसे चोरी झाले असले, तरी माझ्याकडं पैसे होते. पण तरीही मानवच्या प्रेमापोटी मी ते पैसे ठेवून घेतले. 

हिमाचल प्रदेशातून मुलीला भेटून परतल्यानंतर मात्र मी त्याच्या हातावर वीस हजार रुपये ठेवले. तो घेत नव्हता, पण तरीही मी आग्रहानं त्याला दिलेच. म्हणालो, ‘तू आम्हाला आई-वडील मानतो, तर आमच्याकडून आशीर्वाद म्हणून ठेव’. रेल्वेत चोराशी झालेल्या झटापटीत जीवावर बेतण्यासारखा प्रसंग, त्यानंतर झालेलं आर्थिक नुकसान आणि नंतर परक्या ठिकाणी, परक्या माणसाकडून आलेली प्रेमाची, आपुलकीची प्रचिती, हे सर्वच माझ्यासाठी शब्दांत व्यक्त करता येणार नाही असं होतं. आपण कुणावर प्रेम केलं, कुणाला जीव लावला, तर तोही अडचणीच्या काळात आपल्या पाठीशी उभा राहतो, मदत करतो,  माणुसकी दाखवतो. असा हा आणखी एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला होता.    
चंद्रपूरला परतल्यावर माझ्या डाव्या हाताची करंगळी सुजली असल्याचं माझ्या लक्षात आलं. म्हणून अस्थिरोग तज्ज्ञाला दाखवलं व करंगळीचा एक्स-रे काढला. माझ्या करंगळीचे हाड फ्रॅक्चर झालं होतं. जीवावर बेतलेला प्रसंग त्या करंगळीने झेलला होता. व मानवची मानवता आम्हा दोघांना कृतज्ञता देऊन गेली. 
मानवता अद्याप जिवंत आहे, हे दर्शविणारे चंद्रपूर चे प्रसिद्ध हृदयरोग डॉ. अशोक वासलवार यांचे सोबत घडलेले प्रसंग वर्णन... !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या