कोलाम बांधवानी प्रतिसाद द्यावा, पाच दिवसांची मुदत वाढ !
चंद्रपूर (प्रति.) : आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत नागपूर विभागामध्ये चंद्रपूर जिल्ह्यासाठी ७ ऑक्टोंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार १०६८ व ३ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासननिर्णयानुसार ७४३२ असे एकंदर ८५०० शबरी आदिवासी घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. यात चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, मुल, सावली, कोरपना, जिवती, सिंदेवाही, गोंडपिपरी, पोंभूर्णा या तालुक्यामधुन आदिवासी बांधवांनी आपले अर्ज सादर केले आहे. यामध्ये कोलाम बांधवांकडून अद्यापपावेतो या योजनेसाठी योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही. तरी राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यामधुन कोलाम बांधवांनी पुढील ५ दिवसांत आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी आणखी पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे.
कसा घेता येईल योजनेचा लाभ !
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.१.२० लक्ष मर्यादेत आहे, केवळ अशाच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेसाठी दिव्यांग लाभार्थ्यांना ५ टक्के आरक्षण ठेवण्यात यावे. यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी जमातीतील कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य तर मिळतेच सदर घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी १.२० लाख रुपये इतकी आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे. तसेच मनरेगा माध्यमातून या लाभार्थ्यास रोजगार देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना त्यांचे आधार कार्ड, सुरूबँक खाते, पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे पुढील कारवाईसाठी व तात्काळ ऑनलाईन रजिस्ट्रेशन करिता संबंधित ग्रामसेवक यांचे कडे किंवा संबंधित पंचायत समिती येथील घरकुल शाखेकडे जमा करण्यासाठी मंजूर केलेल्या लाभार्थ्याना दोन दिवसांत सुचित करणे आवश्यक असुन यासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना व ज्यांनी अद्यापपावेतो अर्ज सादर केलेले नाहीत अशा राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यामधुन कोलाम बांधवांनी पुढील ५ दिवसांत आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोलाम बांधव त्यांचे अर्ज बिडीओ कार्यालय किंवा ग्राम सचिव तसेच राजुरा वसतीगृहाद्वारे पाठवु शकतील असे आवाहन करण्यात आले आहे.
वाचा शासन निर्णय
शबरी आवास योजनेसाठी सादर करावी लागतील ही कागदपत्रे !
रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जागेचा सातबारा उतारा आणि ७ - अ प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा, जागा उपलब्ध आहे असे प्रमाणपत्र, ग्रामसभेचा ठराव, तहसिलदाराकडील उत्पन्न प्रमाणपत्र हि कागदपत्रे आवश्यक आहे.
0 टिप्पण्या