भुजंग आणि मी ! Bhujang and me


मागची सुमारे पंधरा मिनिटं मी माझ्या कारमध्येच बसून होतो. कारमध्ये कसलं? तर जीवन-मरणाच्या सीमेवरच होतो, असं म्हणणं जास्त उचित होईल. बाहेर प्रचंड वादळी पाऊस पडत होता. त्यामुळं हवेत गारठा निर्माण झालेला होता. या वातावरणात मीही भिजलो होतो, अगदी चिंब, पण पावसानं नव्हे, तर घामानं. छाती इतकी धडधडत होती की काळीज केव्हाही बाहेर येईल असं वाटत होतं...आणि एका क्षणाला वाटलं की बस्स अशोकराव आता तयार रहा, आपला काळ आलाय बहुतेक... आता आपण काही सेकंदाचेच सोबती... हा विचार येताच मी क्षणभर डोळे बंद करून डोके गाडीच्या सीटवर मागं टेकवलं... अगदी क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी वीज चमकावी तशी माझ्यातली सकारात्मक वृत्ती जागी झाली.

‘ठिक आहे, काही सेकंदच ना, पण तितका तर काळ जगून घेऊ आणि जगण्यासाठी काहीतरी धडपड तर करू...’ 

    असा विचार येताच पुढील कृती मी वेगानं करू लागलो. सर्वप्रथम बाहेरच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. पाऊस अजूनही पडतच होता, पण त्याचा जोर कमी झालेला होता. म्हणजे मी जर मोठ्यानं ओरडलो, तर माझा आवाज बाहेरच्याला ऐकू येणार होता. गाडीतून खाली उतरणं किंवा गाडीत आतही छताला, दरवाजाला कुठेही हात लावणं जीवावर बेतण्यासारखंच होतं, पण तरीही हिंमत करून मी गाडीच्या आतलं हॅँडल थोडं फिरवलं आणि माझ्या उजव्या बाजूची काच साधारण एक सेंटीमीटर खाली सरकावली, जेणे करून माझा आवाज बाहेर पोहोचू शकणार होता.

त्यानंतर मी मदतीसाठी मोठमोठ्यानं हार्न वाजवत राहिलो आणि आवाजही देत राहिलो... पाच मिनिटे, दहा मिनिटे... कदाचित एक युगही... प्रत्येक सेकंद  मला मोलाचा वाटत होता, एखाद्या युगासारखा भासत होता... पण सुरवातीची दहा मिनिटे कुणीच मदतीसाठी आलं नाही... आता कुणीच येणार नाही, अशा हतबलतेनं मी हाका मारायचं थांबलो. एक-दोन मिनिटांतच मला समोर हालचाल दिसली. तो आमचा शेतगडी भूजंग होता. हातात लांब दांडीची छत्री घेऊन तो मला मदत करण्यासाठीच येत होता. आता पाऊसही बऱ्यापैकी थांबला होता आणि माझ्या मनातली घालमेलही.. आपण अजूनही जिवंत आहोत व आता यातून खात्रीशीर बाहेर पडू... मनातून आशेचा अंतर्नाद मला ऐकू येत होता.

माझ्या कारवर आणि बाजूलाही तारांचं जाळंच पडलं होतं. आशियातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या चंद्रपूरच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात निर्माण झालेली वीज अतिउच्चदाबाच्या क्षमतेने इतरत्र वितरण केली जात असते. त्यापैकीच या तारा होता. आपल्या दंडापेक्षाही मोठ्या व्यासाच्या आणि चारशे चाळीस व्होल्ट पेक्षाही कितीतरी पट उच्च वीजप्रवाह, म्हणजेच त्यावर कित्येक कारखाने आणि रेल्वेगाड्या चालविण्याची क्षमता असलेला वीजप्रवाह होता. त्यामुळं केवळ त्यांच्या परिघात आलं तरी समोरच्याला भस्म करू शकतील अशी शक्ती असलेल्या या तारा. माझ्या कारवर पडल्या होत्या. कारचं छत, बॉनेट आणि आजूबाजूलाही त्यांचा गुंता झालेला होता. आत असलेला मी कसा कोण जाणे पण बचावलो होतो आणि आता जगण्याची आशा करत होतो.


ही घटना घडली, त्याला आता सुमारे पंचवीसेक वर्ष होऊन गेलेली आहेत. पण आजही ती माझ्या मनाच्या पटलावर जशीच्या तशी कोरलेली आहे. चंद्रपूर शहरापासून सुमारे आठ-दहा किलोमीटरवर असलेल्या विचोडा गावी माझं शेत आहे. त्याच्या देखभालीसाठी तिथे पूर्ण वेळ शेतगडी मी ठेवला होता.त्याचं नावं भुजंग,

 त्याला शेतात घरही बांधून दिलं होतं. हॉस्पिटल आणि पेशंटमधून मला जसा वेळ मिळे, तसा मी महिना-पंधरा दिवसातून माझी झेन कार घेऊन शेतावर जाई. असाच एका संध्याकाळी मी शेतावर कारनं निघालो. दिवस उन्हाळ्याचे होते. मे महिना संपत आलेला होता. पाच सहा किलोमीटर अंतर गेल्यावर आभाळ भरून आलं आणि वेगानं वारं वाहू लागलं.  आमच्या शेताला मोठं लोखंडी गेट आहे, कारच्या उंचीपेक्षाही मोठं. ते ओलांडण्यापूर्वीच टपोऱ्या थेंबांनी पाऊस कोसळू लागला. वादळाचा जोर इतका वाढला की माझ्यासह कारही थरथरू लागली. समोरचं काहीही दिसू नये इतक्या जोरानं पाऊस सुरू झाला. मी कार गेटच्या समोर लावली. आता पाऊस सरेपर्यंत आत बसून राहावं लागणार होतं. काचा आधीच बंद केलेल्या होत्या. 

अचानक वीज पडावी तसा मोठा कडकडाट झाला. माझ्या कारवर काहीतरी जोरानं आदळलं. इतकं की मला आतल्या आत जोराचा झटका जाणवला. आधी वाटलं की वीज पडली असावी, पण नंतर जाणवलं की त्याहीपेक्षा काही भयानक असावं. माझा अंदाज खरा ठरला. वादळी पावसानं आमच्या शेताजवळ असलेला अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीचा टॉवर कोसळला होता. त्याच्या बलदंड तारा गुंता होऊन माझ्या कारच्या छतावर, बॉनेटवर पडल्या होत्या. बॉनेटमधून तर धूरही येत होता...त्याचवेळेस कारच्या आत बसलेल्या मला, आपल्या आयुष्याची दोरी बहुतेक या जाड तारांनीच कापली जाणार असं खात्रीनं वाटत होतं. पण तसं होणार नव्हतं. प्रत्येकालाच आयुष्य संधी देतं, तशी मला एक संधी मिळणार होती... नव्या उमेदीनं जगण्याची.


छत्री घेतलेला भूजंग लवकरच माझ्याजवळ यायच्या प्रयत्नात दिसला.  पण तारांमुळं त्याला माझ्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. काय सांगावं? जर तारांमध्ये वीजप्रवाह अजूनही असेल, तर त्याचाही जीव धोक्यात यायचा. मात्र त्यानं मला ओरडून दिलासा दिला. तो मग त्या तारांना वळसा घालून दुसऱ्या बाजूकडील शेतात गेला. जमिनीवर पडलेल्या एका तारेला त्यानं छत्रीचं टोक लावून पाहिलं. त्यात वीजप्रवाह नाही अशी त्याची खात्री पटल्यावर, तो थेट तारा बाजूला करण्याच्या कामी लागला. तोपर्यंत तिथे आजूबाजूची पंधर-वीस माणसं जमा झाली होती. त्या अवजड तारा एका-दुसऱ्याच्या शक्तीनं दूर होणं अशक्यचं होतं. मग त्यांनी तिथंले काही बांबू कापले आणि काही लाकडंही कापली. त्यांचा वापर करून त्या तारा कारपासून दूर व उंच नेण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रमाणात त्यांना यश आलं. कारच्या आतमध्ये असलेला मी थोडा सावरलो असलो, तरी आत कुठेतरी अजूनही तसा धक्क्यातच होतो. त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणं मी गाडी मागे-पुढे करण्याचा प्रयत्न केला, पण तारांमुळे ती हलत नव्हती. शिवाय तिचं बरंच नुकसान झाल्याचं दिसत होतं. बॉनेटमधून धूर येत होता. मात्र कार सुरू झाली होती आणि हलत होती, ही त्यातले त्यात चांगली गोष्ट होती. शेवटी सर्वांनी केलेला प्रयत्न आणि मी पणाला लावलेलं माझं ड्रायव्हिंगचं कौशल्य यामुळं तारांच्या जंजाळातून कशीबशी कार बाजूला केली आणि एकदाचं मला सर्वांनी बाहेर काढलं. तेव्हा एका भयानक जीवघेण्या प्रसंगातून बाहेर पडल्याचा ताण माझ्या चेहऱ्यावर होता व झाल्या प्रकारानं माझ्यात आता बोलण्याचंही त्राण उरलं नव्हतं. वीजेच्या शॉकपासून मी वाचलो असलो, तरी त्या प्रसंगाचा मानसिक शॉक मात्र मला बसलाच होता.


त्याच सुमारास तिथे एक कंत्राटदार आले. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझ्या गाडीतून घरी जा. तुमची गाडी मी नंतर पाठवून देतो. झालेल्या प्रकारानं तोपर्यंत तिथे बरीच गर्दी झालेली होती. इतक्या दाबाची वीजवाहिनी पडूनही मी जिवंत कसा? याचं प्रत्येकालाच आश्चर्य वाटत होतं. पण झालं असं होतं की उच्चदाब असलेली वीजवाहिनी तूटून थेट माझ्या कारवर न पडता आधी शेताच्या गेटवर पडली होती. लोखंडी गेटमुळं तिच्यातल्या वीजप्रवाहाचं ‘अर्थींग’ होऊन वीजप्रवाह खंडित झाला होता. ते लोखंडी गेट पूर्णपणे तुटलं पण त्यामुळं माझ्या कारवरच्या तारांमध्ये वीजप्रवाह नसल्यानं मी बचावलो.  मला वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना धन्यवाद देऊन आणि परमेश्वराचे आभार मानून मी कंत्राटदाराच्या गाडीनं घरी पोहोचलो. मी दुसऱ्याच गाडीनं घरी आलो हे पाहून पत्नीनं काळजीनं मला काही विचारण्याचा प्रयत्न केला, पण काही बोलण्याइतपतही माझी मनोवस्था नसल्यानं ‘नंतर सांगतो’ असं बोलून मी थेट बेडरूममध्ये डोळे बंद करून बसलो. 

वाचण्यासाठी क्लिक करा.  👉👉 करंगळी व मानव...!                            अश्रूंची फुले होताना...!

एव्हाना दोनेक तासांतच ‘डॉक्टरांच्या कारवर अतिउच्चदाबाची वीजवाहिनी कोसळली आणि ते त्यातून वाचले,’ ही बातमी सगळ्या शहरात पसरली होती. तितक्यात मला औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य अभियंत्यांचा फोन आला. माझी विचारपूस केल्यानंतर त्यांनी जी माहिती सांगितली ती अधिकच धक्कादायक होती. ते सांगत होते की केवळ तुम्ही एकटेच नाही, तर तुम्हाला वाचविण्याचा प्रयत्न करणारे तेथील पंधरा वीस माणसंही मरण पावले असते. कारण काही कारणानं वीजेची तार तुटली, तर वीजपुरवठा खंडीत होतो. ते आमच्याकडील यंत्रणेवरून कळतं. त्यानंतर तो कां खंडीत झाला हे पाहण्यासाठी आम्ही वीजपुरवठा पुन्हा सुरू करतो. पण आज कसं काय माहीत की आमच्यापैकी कुणालाच वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याचं सुचलं नाही. नाहीतर अनर्थ झाला असता. आता माझी खात्रीच झाली की दैव बलवत्तर म्हणून आपण वाचलो आहोत. अनेकदा आपण चांगली कामं करतो, लोकांशी चांगलं वागतो. ते कर्मच अशा बिकट प्रसंगातून तुमची सुटका करत असतं. या शिवाय मला उपकार म्हणावेसे वाटतात ते आमच्या भुजंगचे.  त्यानं मला वाचविण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्न केले होते. आजवर मी त्याला दिलेल्या माणुसकी आणि स्रेहाच्या नात्यामुळंच तो हे करायला तयार झाला होता. माणूस जर चांगला असेल, तर तो तुमच्यासाठी जीवपण लावतो, हे मला तेव्हा उमगलं. अजूनही हा प्रसंग आठवला की अंगावर काटा उभा राहतो. नावं भुजंग असं विषारी सापाचेअसूनही स्वतःचा जीव पणाला घालून मला अक्षयअमृत दिले, मी त्याचे उपकार काय फेडू?



 

प्रसिद्ध हृदयरोगतत्न चंद्रपूर चे  डॉ. अशोक वासलवार यांचे जीवनामध्ये आलेल्या एका प्रसंगाचे वर्णन करणारा लेख.....!

 ashok_wasalwar@yahoo.co.in



वाचण्यासाठी क्लिक करा.  👉👉  नागपूर येथे अखिल भारतीय पद्मशाली समाजाचे भव्य अधिवेशन ! 

                  स्व. रमेश यंगलवार यांना पद्मशाली समाजातर्फे श्रद्धांजली !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या