सर्वच्या सर्वच अकलेचे कांदे !
म्हणूनच जनता जनार्दनाचे वांदे !!
लोका लुबाडणे हेच यांचे धंदे !
तरी कोकलतात आम्ही जनतेचे आहोत बंदे !!
होळीच्या सप्तरंगी प्रेमरंगात रंगु या !!
होळी-होलीकात्सव हा फक्त हिंदुचाच पवित्र सण हे आम्ही तरी मुळीच मानायला तयार नाही. मानवधर्म-सत्यधर्म मानणाऱ्या जगातील मानवांचा हा पावन सण आहे. ना राजा ना रंक, ना कुणी लहान ना कुणी महान याची शिकवण होळी हा सण देतो. अलीकडच्या काळात तुमचे आमचे वैचारिक रंगच उलटेसुलटे झाले आहे. बंधुभाव - प्रेमभाव आपण साफ विसरलों आहे. असुया, शत्रुत्वाच्या भावनेने तुम्ही आम्ही बेरंग झाले आहोत. जाती-उपजाती, धर्म-पंथाच्या संकुचित भिंती उध्वस्त करून मानवधर्माची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या, तेवत ठेवणाऱ्या समाजधुरीणांनीच आता या काळ्याकुट्ट अंधार पर्वातून मानवाची सुटका करायला पाहिजे हेच सांगणे आहे या होलिकोत्सवाचे !
कोण चोर कोण साव, कोण आपला कोण परका, कोण साधु कोण हरामखोर, कोण मित्र - कोण शत्रु, कोण मिठाईलाल कोण नौरंगीलाल, कोण पुढारी कोण माफिया याची ओळख करणे आता भल्याभल्यांना शक्य नाही. गुंड, भ्रष्टाचारी, चरित्रहीन आता लोकशाहीतील राजे-महाराजे बनले आहेत. त्याला अर्थात सन्माननीय अपवाद आहेतच. लोकशाहीचा तथाकथित चौथा स्तंभही आता पार पोखरल्या गेला आहे. हपापाचा माल गपापा असे सारे आता धडाक्यात सुरू आहे. जो बेशरम, जो आग्यावेताळ, जो मुजोर असेल अश्यांना बहुतेक आपआपले आराध्यदैवत बनविले असले तरी या काळोख्या अंधारात खऱ्याखुऱ्या सज्जनामुळे प्रभात फिरणे आता येवू घातली आहेत.
कुणावर प्रखर टिका करण्यापेक्षा होळीचा पदवीदान समारंभ महाकठीण झाला आहे. आमच्या लेखी कुणीही लहान आणि कुणीही महान नाही. त्यांचे सद्गुण महादुर्गुण काहीही असले तरी या ईश्वरांच्या लेकरावर आमचे अतोनात प्रेम आहे. होळीच्या पदवीदानात कुणाचा सन्मान तर कुणाचा अपमान करणे चंद्रपूर पत्रिका स मुळीच अपेक्षित नाही. या उप्परही कुणा अकलेच्या कांद्याच्या भावना दुखावल्या असतील तर त्याचे आम्हास मुळीच सोयरसुतक नाहीच नाही. आता आपण होळीच्या सप्तरंगी प्रेमात न्हावू या !!
(साभार : साप्ता. चंद्रपूर पत्रिका (धुलीवंदन विशेषांक - २००९) संपादक, सुरेश धोपटे )
आप बहुत याद आ रहे है... !!
ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे (Suresh Dhopte) संपादित " चंद्रपूर पत्रिका" (Chandrapur Patrika) नावाचे साप्ताहिक चंद्रपूर येथून प्रकाशित व्हायचे. आपल्या लेखणीने चांगल्या-चांगल्या धुरीधरांना सुरेश धोपटे यांनी या साप्ताहिकातुन धोपटले होते. मागील वर्षी मे महिन्यात अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. दरवर्षी होळीच्या दिवशी नामदान - पदवीदान यामुळे "चंद्रपूर पत्रिका" चा होळी विशेषांक विशेषांक चर्चिला जायचा. आपल्याबद्दल या विशेषांकात काय पदवीदान दिले आहे, या भयग्रस्त मनःस्थितीने या होळी विशेषांकाची सगळा वाचक वर्ग आवर्जुन वाट बघायचा. या होळी विशेषांकामध्ये कोणत्याही आकसाने पदवीदान नसायचे. त्यामुळे स्वतःबद्दल बोचणारे- टोचणारे पदवीदान असुन ही कुणाला याबद्दल राग किंवा आकस नसायचा. “चंद्रपूर पत्रिका" च्या होळी विशेषांकामध्ये स्वतःच्या नावाचे पदवीदान असणे प्रतिष्ठेचे समजले जायचे. ज्यांना पदवीदान केले नाही, त्यांना कमीपणा वाटायचा हा दरारा एखाद्या साप्ताहिक वृत्तपत्राचा पहिल्यांदाच बघायला मिळत होता. पत्रकारांपासुन तर मोठ-मोठ्या नेत्यांपर्यंत धोपटे काका यांच्या लेखणीतुन सुटले नव्हते. आज होळी- धुलीवंदनाच्या या पर्वावर सुरेश धोपटे काका “आप बहुत याद आ रहे है...!” साप्ता. चंद्रपूर पत्रिका (धुलीवंदन विशेषांक - २००९) मधील काही अंश सुज्ञ वाचकांसाठी....!
0 टिप्पण्या