महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात ५०% सवलत !
मुंबई: (का.प्र.) : महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज दिनांक १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर "महिला सन्मान योजना " म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे.
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. सदर सवलतीची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला प्राप्त होत आहे, असे एसटी महामंडळ चे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
0 टिप्पण्या