हेल्पलाईन नंबर व संबंधित अधिकाऱ्यांना द्या माहिती !
चंद्रपूर (का. प्र. ) : येत्या २२ एप्रिल रोजी साजरा होणार्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २00६ तसेच त्याबाबतचे नियम आणि महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध अधिनियम संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे.
बालविवाह होत असल्यास, त्याची माहिती आश्रशाळेतील अधीक्षक-शिक्षक, पोलिस स्टेशन, पोलिस पाटील, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, शहरी/ग्रामीण अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, माध्यमिक व प्राथमिक मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात यावी. तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १0९८ किंवा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर (मो. ८८0६४८८८२२) यांच्याशी संपर्क साधून त्वरित माहिती द्यावी.
याबाबतच्या सूचना प्रकल्प संचालक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (चंद्रपूर / चिमूर), पोलिस उपअधिक्षक (गृह), सर्व तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जि. प. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जि. प. समाजकल्याण अधिकारी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष / सदस्य, शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) आदींना देण्यात आल्या आहेत.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम २00६ चे कलम १३ (४) नुसार अक्षय तृतीया या दिवशी होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास विवाह लावून देणा-या व्यक्ती, विवाहात उपस्थित सर्व नागरिक, कॅटर्स, मंडप डेकोरेशन, फोटोग्राफर, लग्नविधी करणारे व आदींवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
या अधिनियमानुसार २ वर्ष कारावास व एक लाख रुपये दंड किंवा दोन्हीची कायद्यात तरतूद आहे, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या