उद्या जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! Collector's order to keep all schools and colleges in the district closed tomorrow!


18 ते 22 जुलै दरम्यान जिल्ह्यासाठी अलर्ट जारी !

चंद्रपूर (का. प्र.) : चंद्रपूर जिल्ह्यात 18 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार दिनांक 18 आणि 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांना 19 जुलै 2023 रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केले असून नागरिकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत 07172- 251597 आणि 07172- 272480 या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.



            तीन दिवस ऑरेंज तर 21 आणि 22 जुलै दरम्यान यलो अलर्ट

नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 18 ते 22 जुलै, 2023 या कालावधीत चंद्रपूर  जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. यात 18 ते 20 जुलै, 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात ऑंरेंज अलर्ट असून या कालावधीत जिल्‍ह्यात सर्वत्र  हल्‍का ते मध्‍यम विजांच्‍या कडकडाटासह वादळ आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. तसेच दिनांक 21 ते 22 जुलै, 2023 या कालावधीत यलो अलर्ट जारी केलेला आहे. या कालावधीत जिल्‍ह्यात सर्वत्र हल्‍का ते मध्‍यम पाऊस पडण्‍याची अत्‍याधिक संभावना व्‍यक्‍त केली आहे. 

खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दूर रहा. रोडवे, अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातुन जाणे टाळा. खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. पूर आलेला रस्‍ता ओलांडून गाडी चालवण्‍याचा प्रयत्‍न करू नका. पाणी दिसते त्‍यापेक्षा खोल आणि मजबुत असु शकते आणि त्‍यात मोडतोड तीक्ष्‍ण किंवा धोकादायक वस्‍तू, भांडे, छिद्र किंवा विजेच्‍या तारा असु शकतात. पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दूर रहा.

वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना  काय करावे आणि काय करु नये : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. जिल्‍ह्यातील नागरिकांनी उचित काळजी घ्‍यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या