आग विझविणाऱ्या 20 अग्निशमन दुचाकी जिल्ह्याच्या सेवेत! 20 fire fighting bikes in the service of the district!



३० फुट उंचीपर्यंत होऊ शकतो फवारा!

चंद्रपूर (का.प्र) : छोट्या स्वरुपात लागलेल्या आगीच्या ठिकाणी तातडीने वापरता येणारी प्रथम प्रतिसाद यंत्रणा म्हणून आग विझविणाऱ्या २० अग्निशमन दुचाकी (बुलेट) जिल्ह्याच्या सेवेत रूजू झाल्या आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्याला 20 अग्नीशमन बुलेट (बाईक) मिळाल्या आहेत. स्वातंत्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर या अग्निशमन बुलेटचे लोकार्पण श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यासाठी नवनवीन संकल्पना कृतीत आणारे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्ह्यासाठी या आग विझचविणाऱ्या दुचाकी जिल्ह्यात आणल्या आहेत. जिल्ह्यातील 17 नगर पालिका / नगर पंचायतींसाठी 20 अग्निशमन बुलेट गाड्या घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात या दुचाकी चाअत्यंत प्रभावी वापर होणार आहे. तेल व गॅसमुळे लागलेली तसेच विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग ही या दुचाकीद्वारे विझवता येणार आहे. ज्या ठिकाणी फायर टेंडरच्या गाड्या पोहोचू शकणार नाहीत, अशा अरुंद गल्ली बोळात तसेच झोपडपट्टीमध्येही या दुचाकी सहज पोहोचू शकतात व भडकणा-या आगीवर 3 ते 12 मीटर अंतरावरुन तसेच 30 फूट उंचीपर्यंत मिस्ट (Mist) स्वरुपात फवारा मारु शकतात. यामध्ये पाण्यासोबतच रासायनिक फोमचा वापर केल्यामुळे आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवणे सहज शक्य होणार आहे.

चंद्रपूर हा जंगलव्याप्त जिल्हा असल्यामुळे येथे उन्हाळ्यात वनवणवा पेटण्याची शक्यता असते. तसेच येथे मोठ्या प्रमाणात उद्योगांचे जाळे असून अचानक आग लागल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक ठिकाणांवरून अग्नीशामक वाहने त्वरीत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्ह्यात सक्षम यंत्रणा उभी केली जाईल. तसेच जिल्ह्यात फायर ब्रिगेड संदर्भात एक मोठे सेंटरही उभे करण्याचा मानस आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
अशा आहेत अग्निशमन बुलेट गाड्या : वॉटर मिस्ट रॅपिड फायर फायटिंग बाईक्स आणि कॉम्प्रेस्ड एअर फोम बाईक्स अश्या दोन प्रकारच्या दुचाकी आहेत. यामध्ये भिसी, ब्रह्मपुरी, चिमूर, गडचांदूर, घुग्घुस, गोंडपिंपरी, जिवती, कोरपना, मुल, नागभीड, पोंभुर्णा, राजुरा, सावली आणि सिंदेवाही या गावांसाठी प्रत्येकी 1 वॉटर मिस्ट्र रॅपिड फायर फायटिंग बाईक्स (दुचाकी) तर बल्लारपूर, वरोरा आणि भद्रावतीसाठी प्रत्येकी 2 कॉम्प्रेस्ड एअर फोम बाईक्स (दुचाकी) देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments