आमदार होण्यासाठी इच्छुकांची गर्दी ! Crowd of aspirants to become MLA!





चर्चा मात्र जोरगेवारांच्या भुमिकेची...!

चंद्रपूर (वि. प्रति . )
आज सर्वसामान्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या चर्चा होतांना बघायला मिळत आहे. येणाऱ्या दोन-तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील म्हणजे होतीलचं. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा ही विधानसभा क्षेत्रात आमदार होण्यासाठी इच्छुकांची गर्दी झालेली दिसत आहे. जो-तो आपआपल्या क्षेत्रात 'आमचं ठरलयं !' पक्ष आपल्यालाचं पसंती देईल, या आशेने आपापल्या पद्धतीने प्रचाराला लागलेले आहेत. हीचं स्थिती चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात बघायला मिळत आहे. ७१ - चंद्रपूर मतदार संघात ३९० मतदान केंद्र असुन पुरुष मतदार १८४११९, स्त्री मतदार १७८०१२, इतर- ३५, अशी एकंदर ३ लाख ६२ हजार १६६ मतदार आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसमधून २१ च्या जवळपास इच्छुक उमेदवार 'आमदार' होण्याचे स्वप्न पहात आहेत. यातील काहींनी तर अप-आपल्या पद्धतीने प्रचाराला प्रारंभ ही केलेला दिसत आहे.  किशोर जोरगेवार यांचे अजुन ठरलेले नसुन ते भाजप च्या कमळाची साथ घेतात की महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती देतील ही येणरी वेळ सांगेल, परंतु प्रत्येक भावी आमदारांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र ७२ हजाराचे मताधिक्य घेवून निवडून आलेले चंद्रपूर चे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची एवढ्या गर्दीत ही नावाची चर्चा होतांना दिसत आहे.


भावी आमदारांचा ओढा 'काँग्रेस' कडे !
लोकसभा निकालानंतर काँग्रेस मध्ये अति उत्साहाचे वातावरण आहे. आमदार होण्यासाठी जो-तो काँग्रेसचा 'हात' हाती घेण्यास गर्दी करीत आहे. दोनदा पराभुत झालेले महेश मेंढे यांनी निकाल लागतांक्षणीपासुनचं फ्लैक्स बॅनरच्या माध्यमातुन प्रचाराला(?) सुरूवात केली आहे. चंद्रपूरात वादग्रस्त राहिलेले मुळचे नागपूरचे सेवानिवृत्त पो. नि. सुधाकर आंभोरे यांनी ही स्थानिक खासदारांशी जवळीक साधत आपणचं आमदार या थाटात बॅनरबाजी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. डॉ. दिलीप कांबळे, नागपूरचे कुणाल राऊत, अनुताई दहेगांवकर, अशोक म्हस्के, पवन भगत, प्रविण पडवेकर, कुणाल रामटेके अशा अनेकांची मोठी यादी काँग्रेसपाशी आहे. काँग्रेस कार्यकर्ते मात्र नवनव्या भावी आमदारांमुळे कुणाच्या संपर्कात रहावे, या संभ्रमात आहे. जिल्हा काँग्रेसमधील गुटबाजींमध्ये पक्षश्रेष्ठींकडे ज्यांच्या हाताचे 'पारडे जड होईल त्या उमेदवाराला ‘लॉटरी' लागेल. तोपर्यंत कांग्रेस कार्यकर्त्यांनी आपला भावी आमदार ठरवुन 'कामाला' लागल्याचे चित्र दिसत आहे.

जोरगेवारांना कसरतचं करावी लागणार !
चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांचे अजुन ठरले नसुन मतदारांमध्ये विविध चर्चा होऊ लागल्या ओहत. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली तर भाजपमधील आमदार पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नाराजी व भाजप कार्यकर्त्यांची मनधरणीसाठी पुर्वाश्रमीचे भाजपचे जोरगेवार यांना कसरत करावी लागणार, हे निश्चित आहे. महायुतीचे एकनाथ शिंदे यांच्या गटानी जोरगेवार यांना तिकीट दिली तरी चंद्रपूरात शिंदे गटाची आजची 'ताकद ( ? )' बघता जोरगेवार यांची दारोमदार ही भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांवरचं राहणार आहे, हे ही तेवढेच सत्य आहे. मागील निवडणुकीत २०० युनिट मोफत विज देण्याचे दिलेले आश्वासन हे या निवडणुकीत जोरगेवारांच्या मानगुटीवर बसलेले राहीलचं. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार मुनगंटीवार यांचेसोबत जोरगेवार यांची दिलजमाई नंतर ही चंद्रपूरात ३९ हजारांचे मताधिक्य काँग्रेसला उमेदवाराला मिळाले होते, ही बाब बरेच काही सांगणारी आहे. चंद्रपूरात कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे समन्वय साधत मतदारांचा मत प्रवाह बदलविण्याचे कौशल्याची कसोटीपणाला लागणार त्यामुळे ही निवडणुक किशोरभाऊ साठी कसरती सोबतचं कौशल्याची कसोटी पणाला लावणारी राहणार आहे. काही ही असो यास्थितीत ही 'चर्चा' मात्र 'जोरगेवार' यांचीच सुरू आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या