१६ ला होणार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे हस्ते प्रियदर्शनी सभागृहांमध्ये उद्घाटन !
चंद्रपूर (का.प्र.)
महाराष्ट्रात अतिचर्चिली जाणारी लाडकी बहीण योजनेची पहिली दोन महिन्याची किस्त 16 तारखेला लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये जमा होणार असून चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांचे हस्ते या महत्वकांक्षी योजनेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती पालकमंत्री नाम. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या पत्रकार परिषदेत बोलताना मूनगंटीवार यांनी 31 ऑगस्ट नंतरही या योजनेचा फार्म भरता येणार असल्याची सांगितले. तसेच जुलै व ऑगस्ट महिन्याची लाडक्या बहिणींना भेट रक्षाबंधनपूर्वी 16 तारखेपासून बँकेत टाकण्यात येणार असून रक्षाबंधन पूर्वी महाराष्ट्र राज्यातील सर्वच बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. तांत्रिक परिस्थितीमुळे ही रक्कम पोहोचण्यासाठी कमीत कमी ४८ तासांचा अवधी लागत असला तरी रक्षाबंधनपूर्वी सर्वच बहिणींना याचा लाभ मिळणार असून कोणत्याही अफेवर विश्वास न ठेवता ज्यांनी अर्ज भरले नाहीत त्यांनी त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा असे आवाहन ही त्यांनी केले.
राज्य शासनाची अतिशय महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ लक्ष ८४ हजार ८५७ अर्ज प्राप्त झाले. यापैकी तपासणी पूर्ण झालेल्या अर्जाची संख्या २ लक्ष ८१ हजार ५८८ आहे. ही टक्केवारी ९८.८५ आहे. योजनेसाठी पात्र ठरलेले अर्ज २ लक्ष ६७ हजार ८४६ असून जिल्हास्तरावरून शासनाकडे निधी वितरणासाठी या सर्व पात्र अर्जाची शिफारस करण्यात आली आहे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सर्व लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी १५०० रुपये याप्रमाणे ३००० रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या