‘शांत— शहराला ‘अशांत' करणारे हे आहेत तरी कोण ?
चंद्रपूर (वि. प्रति.) : सोमवार १२ तारखेला चंद्रपूर शहराच्या भर वस्तीत ४८ वर्षिय कुख्यात हाजी सरवरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यातून शहरात 'अशांतता' निर्माण झाली आहे. शांतताप्रिय शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरात 'अशांती' पसरविणारे 'हे' आहेत तरी कोण ? अणि येतात कुठून ? शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा जिम्मा असलेली पोलीस यंत्रणा यावेळी काय करीत असते ? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होतात. चंद्रपुरात कोळसा - रेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर पसरला आहे या कोळसा व्यवसायात तस्करी ही मोठ्या प्रमाणात होत आहे, यातूनच अनेक छोटे- मोठे गुन्हेगार प्रवृत्तीचे युवक या कोळसा - रेती तस्करीकडे आकर्षिले गेले आहेत.
खून, खंडणी, शस्त्रांची तस्करी अशा अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला हाजी सरवर शेख याने जिल्ह्यात सर्वप्रथम बंदुकीच्या धाक दाखवून दहशत निर्माण केली होती त्यावेळी पोलीस यंत्रणेने त्याच्याजवळ आलेली शस्त्र हे कुठून आले याचा तपास घेतला असता तर आज शस्त्रांच्या एवढा मोठा वापर शहरांमध्ये दिसला नसता हेही तेवढेचं सत्य आहे. पुणे- मुंबई सारख्या शहरांसारखी गुंडगिरी व हप्ता वसुली अशा प्रकरणांची शहरात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ ही चिंतेची बाब आहे.
गुन्हेगारांचे राजकीय ‘कनेक्शन' पोलिसांसाठी डोकेदुखी !
मागील काही वर्षापासुन जिल्ह्यात गुन्हेगारीने प्रवृत्तीने घातक स्वरूपात डोके वर काढले आहे. नुकतेच विक्रांत सहारे या युवा पुढाऱ्यांचा घरी मिळालेला काडतुसाचा जखिरा, यापूर्वी शिवा वझरकर या युवा पदाधिकारी यांची झालेली हत्या, अमन अंदेवार यांचेवर झालेला प्राणघातक हल्ला या घटना बरेच काही सांगुन जाणाऱ्या आहे. मृत हाजीसह अनेक गुन्हेगार प्रवृत्तींच्या लोकांचे राजकीय कनेक्शन आता लपून राहिले नाही. याच राजकीय कनेक्शनमधुन गुन्हेगारांच्या 'आशा' घातक स्तरावर पल्लवीत झाल्या आहे व त्यातून शहरात अशांतता पसरत आहे. या गुन्हेगारांचे राजकीय कनेक्शन व त्यातुन त्यांचे समाजात "व्हाईट कॉलर" वावर, फ्लैक्स बॅनरमधुन झळकणे यामुळे अल्पवयीन मुले, युवक या गुन्हेगारांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे, ही बाब जिल्ह्यासाठी भविष्यात घातक सिद्ध होणारी आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींच्या युवकांचे राजकीय पक्ष-नेत्यांशी असलेले कनेक्शन पोलिसांसाठी डोकेदुखी व कारवाईसाठी अडसर ठरत असल्याचे दिसत आहे . राजकीय पक्षांनी - नेत्यांनी अशा गुंड प्रवृत्तीच्या व पैशासाठी गैर मार्गाचा अवलंब करणाऱ्यांशी राजकीय पक्षांनी -नेत्यांनी आत्ताच फारकत घेतली तर बरे राहील अन्यथा या गुंड प्रवृत्तीची दिवसें-दिवस वाढत असलेली प्रवृत्ती एखाद्या वेळेस त्यांच्या अंगावर उलटण्यास वेळ लागणार नाही.
अस्तित्वातील बंदुकीचा तपासावर प्रश्नचिन्ह !
जिल्ह्यात मागील काही वर्षापासुन गुन्हेगारांकडून बंदुकीचा खुलेआम वापर होत आहे. दुर्घटना-घटना घडल्यानंतर पोलिस आरोपींना अटक करतात, तपास करतात परंतु त्यांचेकडुन गुन्ह्यात वापरण्यात येणाऱ्या बंदुकांचे मुळ शोधण्यास पोलिसांना जास्त "रस" असल्याचे दिसत नाही. मृत हाजी सरवरने जिल्ह्यात पहिल्यांदा बंदुकीच्या भरवशावर दहशत निर्माण केली होती. त्यावेळी ती बंदुक आली कुठून याचा तपास पोलिसांनी केला असता तर आज हाजी ची हत्या बंदुकीनी झाली नसती व शहरात आज बंदूकीचा एवढा वापर झाला नसता. पोलिसांनी गुन्हेगारांकडे बिना परवानगी वापरण्यात येणाऱ्या बंदुकीची तपासणी, त्याचे विक्रेते यांचा गांभीर्याने तपास करावा, अशी मागणी आता सामान्य नागरिकांकडून होत आहे.
गुन्हेगारांचे फोन सार्वजनिक करण्याचे पालकमंत्र्यांचे पोलिसांना आवाहन !
जिल्ह्यात गुन्हेगारांचे राजकीय कनेक्शन मोडून काढण्याचे पालकमंत्र्यांनी पोलिस अधिक्षकांना निर्देश दिले आहे. गुन्हेगारांचे फोन सार्वजनिक करून हे कनेक्शन तोडता येवू शकते. मागील काही वर्षापासून गुन्हेगारांना राजकीय संरक्षण प्राप्त असुन राजकीय नेत्यांनी गुन्हेगारांपासुन आत्तापासुन फारकत घ्यावी, असे आवाहन ही एका संदेशात पालकमंत्र्यांनी केले आहे.
Link वर Click करा व बातमी वाचा....
0 टिप्पण्या