"कामाला लागा" वरिष्ठांचा इच्छुक उमेदवारांना आदेश ! "Get to work" orders of seniors to interested candidates!



इच्छुक उमेदवार लागले विधानसभेच्या तयारीला...!

चंद्रपूर (वि. प्रति . )

नोव्हेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होतील असे बोलल्या जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बदलेल्या परिस्थितीनंतर विधानसभेसाठी महाविकास आघाडी मध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. जिल्ह्यात विशेष करून काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडे इच्छुकांची 'लय' मोठी रांग दिसत आहे. पक्षश्रेष्ठींनी कोणाची नाराजी न ओढवण्यासाठी प्रत्येक इच्छुक उमेदवाराला "कामाला लागा" चा आदेश दिल्यामुळे आपल्यालाच उमेदवारी मिळेल या विश्वासाने सर्वच जण कामाला लागले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये 'गर्दी' दिसत असुन आपण कसे समोरच्यापेक्षा वरचढ आहोत, हे दाखविण्यास सर्वच इच्छुक उमेदवारांची चढाओढ सुरू आहे. विविध सणासुदी, महापुरूषांच्या जयंत्या, पुण्यतिथी इत्यादी कार्यक्रमात आपआपल्या विधानसभाक्षेत्रामध्ये इच्छुकांनी फ्लॅक्स बॅनर, पोस्टर, जाहिराती यामधुन आपआपली दावेदारी सुरू केली आहे. महाराष्ट्रामध्ये २८८ जागांसाठी काँग्रेसकडे १४०० च्या जवळपास उमेदवारांनी आपली इच्छा प्रकट केल्याचे सांगण्यात येते. महाविकास आघाडीकडून (काँग्रेस) डॉ. दिलीप कांबळे, महेश मेंढे, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक सुधाकर आंभोरे, राजु झोडे, अश्विनी खोब्रागडे, प्रविण पडवेकर, अशोक म्हस्के, डॉ. अभिलाषा गावतुरे, शरदचंद्र पवार गट ( राकाँ) संतोष रावत (?), राजेंद्र वैद्य, बंडू धोत्रे, भानेश मातंगी, शिवसेना (उबाठा) संदिप गिऱ्हे सह फार मोठी यादी समोर येत आहे. निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये असंतुष्टांना संतुष्ट करण्याचे जोखमीचे कार्य वरिष्ठांना पार पाडावे लागणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

बहुमताचा जादुई आकडा !

२८८ जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये बहुमताचा १४५ चा जादुई आकडा महायुती किंवा महाविकास आघाडी गाठू शकणार नसल्याचे चित्र आतापर्यंत विविध एजेंसी व मिडीयाने केलेल्या सर्व्हेमधुन दिसत आहे. निवडणुकीनंतर ही सत्तास्थापनेसाठी जुगाड, जोडजंतर करावे लागणार हे निश्चित आहे. त्यासाठी ज्यांचेकडे 'सेफ प्लॅन' आहे ती आघाडी किंवा युती आपला मुख्यमंत्री बनवेल हे मतदारांना आता कळून चुकले आहे.

काँग्रेसमध्ये उत्साह तर भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये 'निष्ठा' चा अभाव! 

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये ( अती ) उत्साहाचे वातावरण संचारले असुन भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये 'निष्ठा' अभावानेच बघायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुनगंटीवार यांचा मोठ्या मताधिक्याने झालेला पराभव याच 'निष्ठा' चा अभाव असल्याचा परिणाम होता, हे सांगण्याची गरज नाही. निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने नागरिकांसाठी योजनेच्या स्वरूपात दाखविलेले 'गाजर' मतदारांपर्यंत पोहोचविण्यात भारतीय जनता पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील निष्ठा व उत्साहाअभावी अपयशी ठरत आहे हे सध्याचे चित्र आहे.

‘थेट संपर्क’ साधणाऱ्या उमेदवाराला राहील मतदारांची 'विजयाची' भेट !

संभाव्य उमेदवारांनी आपण 'भावी आमदार' असल्याचे जाहीर केल्यामुळे आपल्या क्षेत्रात कोण इच्छुक आहेत, याची माहिती आता मतदारांना झाली असल्यामुळे मतदारांशी 'थेट संपर्क' ठेवणाऱ्या उमेदवाराला मतदार राजा 'विजयाची भेट' देऊ शकेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रत्येक 'भावी आमदार' हा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाची उमेदवारी मागत आहे. कुणी जातीय समिकरणाच्या आधारावर तर कुणी राजकीय 'वट' वापरुन आपली उमेदवारी पदरात पाडून घेण्यात सध्या व्यस्त आहे. त्यात अयशस्वी झालेले आपल्यावर कसा अन्याय झाला म्हणत 'अपक्ष' म्हणुन बंडखोरी करीत आपली उमेदवारी दाखल करतील व मतांचे विभाजन करतील, हे सुनिश्चित आहे. मतदारांनी आपला 'लोकप्रतिनिधी' अजुन निश्चित केला नसल्यामुळे ज्या उमेदवारांचे जबाबदार (?) वरिष्ठ पदाधिकारी किंवा स्वतः उमेदवार निवडणुकीला अवधी असल्यामुळे मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधु शकतो, असे गृहीत धरून ग्रामीण स्तरावर संभ्रमात असलेल्या मतदारांशी आपला थेट संपर्क वाढवू शकले तर 'विजयाची भेट' नक्कीच आश्चर्यकारकरित्या आपल्या गळ्यात पाडू शकेल अशी स्थिती आज संपूर्ण जिल्ह्यात बघायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा ही मतदार संघात कमी जास्त हीच स्थिती आहे. तिन लाखाच्या जवळपास मतदारांची संख्या प्रत्येक मतदार संघात आहे. प्रत्येक ग्रामस्तरावर आज उमेदवार पोहोचू शकतो, ही स्थिती बघता उमेदवारांनी ग्रामस्तरावर आपला मोर्चा वाढविला, तिथल्या समस्या यांचा विचार आता उमेदवाराने करायला हवा व थेट जनसंपर्कावर भर उमेदवारांनी द्यायला हवे तर विजयाची माळ गळ्यात पाडणे अशक्य नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

फ्लैक्सबाजी व चमकोगिरीने वैतागलेला 'मतदार' किमया दाखविणारचं !

मागील पाच वर्षात महाराष्ट्रात घडलेले राजकीय नाट्य, वृत्ताच्या माध्यमातुन अकल्पनीय राजकीय घडामोडी बघितलेला ग्रामीण मतदार आज फ्लैक्सबाजी, चमकोगिरी याने कमालीचा वैतागलेला दिसत आहे. मतदाराला आज प्रत्यक्षात ग्रामस्तरावरील समस्या सोडविणारा प्रतिनिधी हवा आहे. ग्राम स्तरावरील नाली सफाई, नियमित पाणी पुरवठा, घरकुल योजना, विजेचा पुरवठा, चांगले रस्ते या दैनंदिन सुविधा घोषणाबाजी न करता हक्काने मिळवून देणारे स्वराज्य - सुराज्य मतदाराला हवे आहे. ग्रामस्तरावर ज्यांचेवर ही जबाबदारी सोपविली ते फक्त चमकोगिरी व बॅनरबाजीमध्ये व्यस्त राहिले. जमिनी स्तरावर - ग्रामस्तरावर, राजकीय पुढाऱ्यांसोबत फिरण्यात व फोटोसेशन मध्ये व्यस्त राहिलेल्या गाव पुढाऱ्यांबद्दल चा हा रोष मतदारांनी मतपेटीतून विधानसभा निवडणुकीत काढल्यास आश्चर्य वाटायला नको. ग्रामीण मतदारांचा हा रोष पांगविण्यासाठी फक्त पदाधिकाऱ्यांवर व गावपुढाऱ्यांवर विसंबून न राहता उमेदवारांनी बॅनरबाजी व चमकोगिरी ला बाजुला सारून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीकडे आपले लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. 'ऑनलाईन' च्या या जमान्यात ग्रामीण मतदार जमिनी स्तरावरील समस्यांना सामोरे जातांना दिसत आहे. हक्काच्या अनेक शासकीय योजनांचा लाभ 'ऑनलाईन' न समजल्या-उमजल्यामुळे ग्रामीण व शहरी अनेक मतदारांना आज वंचित रहावे लागत आहे. ई-पिक विमा योजनांसारख्या योजना फक्त मोबाईल क्रमांक लिंक नसल्यामुळे व आधार अपडेट नसल्यामुळे गरजु लाभार्थ्यांना लाभ घेता आला नाही. गाव पुढारी म्हणवून घेणाऱ्यांनी, बॅनरवर झळकणाऱ्यांनी 'लाभार्थी' असलेल्यांना त्यांच्या समस्या सोडविण्याचे कर्तव्य - जबाबदारी मात्र पार पाडली नाही. आत्ता - आत्ताची लाडकी बहिण योजना, वयोश्री योजना, मुख्यमंत्री तिर्थयात्रा योजना असो की शासनाच्या जनहितकारी योजना याच कारणांनी प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे गाव - पुढारी, प्रतिनिधींचे 'खासम -खास' म्हणविणारे या लाभार्थ्यांपर्यंत 'मतां'चा जोगवा मागण्यासाठी या मतदारांपर्यंत पोहोचण्याची हिंमत करू शकत नाही, ही वास्तविकता आहे. फक्त चमकोगिरी करण्यात व नेत्यांना खुश करण्यात 'ते' व्यस्त आहेत व नेत्यांना भावी आमदारांची दिशाभूल करीत आपला 'दर' वाढविण्यात मग्न असल्याचे चित्र आज बघायला मिळत आहे. खाजगीमध्ये अशा मध्यस्थांना 'शिव्यांची' लाखोळी वाहतांना हमखास बघायला मिळते. त्याच कारणाने जे उमेदवार 'थेट मतदारांपर्यंत' पोहोचतील त्याच उमेदवाराला 'विजयाची भेट' मतदार राजा देतील हे ही तेवढेच सत्य आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने हे दाखवून दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या