चंद्रपूर (वि. प्रति . )
“निष्ठावान कार्यकर्ते व नोकिया चा हॅन्डसेट भेटत बी नाही... अन् दिसत बी नाही...!” तालुक्यातील चहाच्या टपरीवर एक सत्तरी गाठलेला कुर्ता व स्वच्छ, पांढरा पायजामा परिधान केलेला व स्लिपर चप्पल पायात घातलेल्या त्या म्हाताऱ्याचे वरील वाक्य ऐकून कान टवकावरले. राजकारणात गंभीर जखमी झालेले प्रगल्भ मुरलेले ते व्यक्तीमत्व असल्याचे सहजचं वाटुन गेले. यासाठी थोडा अवधी चहा टपरीवर थांबण्याचा मोह आवरता आला नाही. त्याठिकाणी असलेल्या २५-३० वर्षाच्या अॅन्ड्राईड मोबाईल बघुन फिदी फिदी हसणाऱ्या युवांना संबोधून त्या म्हाताऱ्याने वरील वाक्य उद्गारले होते त्यांना मुरलीकाका म्हणुन संबोधत होते. टपरीवरील बुजूर्ग-मध्यमवर्गीयांच्या चर्चेतुन कळले की, एका राजकीय नेत्याच्या अगदी जवळचे असलेले साधे भोळे वजनदार व्यक्तीमत्व होते. 'त्या' राजकीय नेत्याला नंतरच्या काळात पक्षाने उमेदवारी दिली तो निवडुन आला, तालुक्याचा प्रतिनिधी ही झाला. त्या राजकीय नेत्याने 'मुरली' काका ला आणखी जवळ घेतले. शेतमजुर असलेल्या मुरलीकाकांचे आजुबाजुच्या दहा-बारा गावात चांगले वजन व 'प्रतिभा' होती. त्याचा लाभ त्याच्या नेत्याला ही व्हायचा. मुरली अत्यंत प्रामाणिक आहे, याची जाणिव त्या नेत्याने शेवटपर्यंत ठेवली. मुरलीकाका ने ही कधी बेईमानी केली नाही. राजकीय पक्षातील अस्थिरता व अन्य कारणाने दोनदा तालुक्याचा प्रतिनिधी राहिलेल्या त्या नेत्याने निवडणुकीला कायमचा राम-राम ठोकला, गावाकडील शेती व नागरिकांची दैनंदिन कामे करण्यात आपले म्हातारपण घालविण्याचा निश्चय नेत्यानी केला. गावाकडे असलेल्या शेतातील पाच एकर शेती शेतमजुर असलेल्या मुरलीकाकाला देऊ केली, मुरलीकाकाने ती स्विकारली नाही परंतु त्या नेत्याने त्याचे नावाने करून दिली. पुर्वी ही मुरलीकाका त्या नेत्याच्या शेतात शेतमजुरी करायचा. आज ही स्वतःची असलेली शेती तो भाड्यानेचं ( बटई) करतो व शरीराने अधु झालेल्या नेत्याची शेती मुरलीकाका करतात. 'मुरली' काकांच्या स्वाभिमानी होण्याच्या अनेक बाबी त्याठिकाणी चर्चिल्या गेल्या. शेतमजुर असलेल्या मुरलीकाकाने आपल्या मुलाला शिकविले, गुणवत्तेच्या आधारावर शिक्षक म्हणुन तालुक्याच्या ठिकाणी नोकरीवर लागला. आज नातु शहरात मोठ्या पदावर कार्यरत आहे. तालुक्यात “हाट” (आठवडी बाजार) च्या दिवशी मुरलीकाकांना त्यांच्या दुचाकी ने सोडून देतो. मुरलीकाका तालुक्यापासुन सात-आठ कि.मी. लांब असलेल्या त्यांच्या स्वगावी तिथुन पायदळ जातो यासोबतचं. त्यांच्या शिक्षक मुलाजवळ नोकिया कंपनीचा साधा मोबाईल आहे. तो बिघडला तरी शहरात नेऊन त्याला बनवुन आणुन पुन्हा वापरतो या लहान-लहान बाबींवरून चर्चा सुरू झाली. यावरूनचं बहुतेक आजच्या राजकीय परिस्थितीवर अनुभवातुन अत्यंत बोलके भाष्य करणारे मुरलीकाकाने उदाहरण दिले असेल.
CLICK.... तीन 'वार' ठरले, बाकीच्यांना "वाट" पक्षाच्या आदेशाची...!
वाचक, टिआरपी, व्हिवर्स, सबस्क्राईबर, फालोअर्स च्या मायाजालात गुरफटलेल्या नेतेमंडळीकडे मतदारांना खेचुन आणणारे पदाधिकारी अभावानेच आढळतात. चमकोगिरी, दिखावा यात रममाण असलेल्या नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे मतदाराकडे व शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहचविण्याकडे होत असलेले दुर्लक्ष नेत्यांना व राजकीय पक्षांना घटक ठरत आहे. कार्यकर्ता कोणत्या जातीचा आहे, त्या जातीचे मतदार किती याचा आढावा घेवून आजच्या स्थितीला दिली जात असलेली उमेदवारी, हाच फार्मुला कायम राखत स्थानिक स्तरावर समाजात कवडीची लायकी नसणाऱ्यांना कार्यकर्त्याला पक्षात जात पाहुन दिली जाणारी पदे यामुळे प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्त्यांचा दुखावला जातो. त्याचा परिणाम निवडणुकीत अनपेक्षित पराभवाचा नेत्यांना पक्षांना अनुभवावा लागतो. “नोकियाचा टिकाऊ हॅन्डसेट व निष्ठावान कार्यकर्ता आज दिसत बी नाय... आणि भेटत बी नाय...!” नोकिया चा हॅन्डसेट ज्यांनी वापरला आहे ते आज ही त्याच्या टिकाऊपणा ची गॅरंटी घेतात... व आज नोकिया चा हॅन्डसेट मिळत नाही, याची खंत ही व्यक्त करतात. म्हणुनचं मुरलीकाकाने एका वाक्यात वर्णिलेली स्थिती आज राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी उद्बोधक ठरावी अशी आहे,त्याचसाठी हा लेखप्रपंच !
0 टिप्पण्या