चंद्रपूर (वि. प्रति . )
चंद्रपूर जिल्हा मध्य. सहकारी बँकेत ३६० पदाची नोकर भरती घेतांना नियमांना डावलुन आर्थिक देवाण- घेवाणीतुन आरक्षणाला बगल देत नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात आली, ती नोकर भरती करण्यात यावी या मागणीसाठी गुरूवार २ जानेवारी २०२५ पासुन सर्व समाज संघटना मिळून आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आरक्षण वाचविण्यासाठी नागपूर रोड वर ठिय्या आंदोलन करीत आहे. पेपरफुटी, परिक्षेत घोळ हे सर्व प्रकार समोर येत असतांना या अन्यायाविरोधात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सीडीसीसी बँकेच्या भोंगळ नोकर भरतीविरोधात विविध समाज संघटनांनी आरक्षण बचाव कृती समिती स्थापन करून ठिय्या आंदोलनाला प्रारंभ केला.
चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत 'औचित्या' चा मुद्दा उपस्थित करीत केला. विधानसभेत लक्षवेधीद्वारे राजुराचे आम. देवराव भोंगळे यांनी ही सदनाचे लक्ष वेधले. आंदोलनाच्या नवव्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे चंद्रपूरात कर्मवीर मा.सां. कन्नमवार यांच्या शतकोत्तर जयंतीनिमीत्त चंद्रपूरात आले असतांना त्यांना आंदोलन स्थळी आणण्याचे 'औचित्य' मोठेपणा (?) जोरगेवार दाखवु शकले नाही, याचा रोष आंदोलनकर्त्यांनी या निमीत्ताने व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांचे साधे मोबाईल उचलण्याचे ही औचित्य आमदार महोदयांनी दाखविले नाही. ही बाब मात्र पचनी पडणारी नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली. राज्यात कृतीशिल व गतिशील सरकार स्थापन झलेल्या सरकारचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे मुख्यमंत्री यांना सीडीसीसी बँकेच्या गैरकारभरासंबंधात तक्रारी प्राप्त झाल्या असुन ही त्यांनी या गंभीर प्रकरणाला पाठ दाखवित आंदोलनस्थळापासुन आपला ताफा जात असतांना आंदोलनाची साधी भेट देण्याचे टाळले, ही बाब अतिशय गंभीर आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्ते ओबीसी सेवा संघाचे सरचिटणीस राजु कुकडे यांनी व्यक्त केली आहे. या नंतर आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
बँकेच्या अधिकाऱ्यांना जेलमध्येच जावं लागेल-मुनगंटीवार
चंद्रपूरमध्ये १५ व १६ ऑक्टोबर १९५६ ला विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः दिक्षाभूमीवर आले. हात उंचावून सांगितलं की, चंद्रपूरच्या भूमीमध्ये शोषीतांवर अन्याय होता कामा नये. आणि आता त्याच चंद्रपूर जिल्ह्यात अनुसूचित जातीवर अशा पद्धतीने अन्याय होत असेल, तर ही निश्चितपणे अतीशय गंभीर बाब आहे. या प्रकाराला अॅट्रॉसीटी कायदा लागू होतो. उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार बँकेच्या अधिकाऱ्यांना जेलमध्येच जावं लागेल, असे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. आंदोलन मंडपाला मुनगंटीवार यांनी काही दिवसापूर्वी भेट दिली होती, त्यावेळी यावेळी मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस याना मंडपातून फोन लावून नोकर भरती प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेण्याची सूचना केली होती, हे विशेष !
बँकेच्या संदर्भात बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या पदभरतीमध्ये सुरू असलेल्या प्रकार निंदनीय आणि धक्कादायक आहे. भरती प्रक्रियेमधून आरक्षणच संपवण्याचा हा कुटील डाव आहे. या प्रकाराविरोधात विविध संघटनांचे व प्रवर्गांचे नेतृत्व करणारे लोक उपोषण करत आहेत. अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, महिला या सर्वांचे प्रतिनिधीत्व करणारे या विरोधात उभे ठाकले आहेत. ही बँक समाजाची आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांची आहे. या बँकेत प्रवर्गांना आरक्षण नाही. लाडक्या बहीणींनी आमचं सरकार आणलं. त्या बहीणींनाही आरक्षण नाही, हे धक्कादायक आहे.
उपविधीचे दाखले देऊन उपोषणकर्त्यांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर लगेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. त्यांना विनंती केली की सरकार म्हणून यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात संविधानाने दिलेल्या अधिकारांवरच आक्रमण केले जात आहे. अशा वेळी शोषीत, वंचितांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण कुठल्याही परिस्थितीत एकाही मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तीवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली.
उपोषणकर्त्यांनी ओबीसी आयोगाच्या अध्यक्षांनाही पत्र दिलेलं आहे. अनुसूचित जाती आयोगालाही पत्र देणार आहेत. शोषीतांच्या अधिकारावर घाला घालण्याचा प्रयत्न झाला, तर चंद्रपूर जिल्ह्यातील जनता अशांना झटका दिल्याशिवाय राहणार नाही. व्यवस्थापन कसेही असू द्या, त्यांना या उपोषणकर्त्यांसमोर झुकावेच लागेल, असेही आमदार मुनगंटीवार म्हणाले.
मागासवर्गीय संघटना एकवटल्या..!
मागासवर्गीय समाज संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता एकवटले आहेत. यामध्ये आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती अंतर्गत कुणबी एकता मंचचे अध्यक्ष इंजि. दिलीप झाडे, जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली, राष्ट्रीय तेली समाज संघटनेचे अध्यक्ष राजेश बेले, भोई समाज संघटनेचे अध्यक्ष बंडु हजारे, स्वराज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक सुर्या अडवाले, पीपीआयडी, चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षा नभा वाघमारे, धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष संजय कन्नावार, गोंडी धर्मिय समाज संघटनेचे नेते रमेश मेश्राम, वाहतूक सेनेचे महेश वासलवार, झाडे सुतार समाज अध्यक्ष मंगेश बुरडकर, महाराष्ट्र नाभिक संघ दिनेश एकवनकर, अहिर समाज संघ अध्यज अनुप यादव, पांचाळ सुतार समाज संघटनेचे अध्यक्ष मनोज तांबेकर, ओबीसी सेवा संघांचे सरचिटणीस राजु कुकडे, सुनील गुढे एकवटले आहेत.
0 टिप्पण्या