चंद्रपूर (का. प्रति.) : गोंडकालिन परंपरा ने नटलेले चंद्रपूर शहर (मुख्यालय) सध्या रस्त्यावर खोदण्यात आलेले जिवघेणे खड्डे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 'गेला रस्ता कुणीकडे, खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई...!' असे म्हणण्याची वेळ या रस्त्यावर चालणाऱ्यांना म्हणण्याची वेळ आली आहे. तसे चंद्रपूर शहरातील गांधी चौक ते जटपुरा गेट व परत जटपुरा गेट ते गिरनार चौक (कस्तुरबा गांधी चौक) ते पुन्हा गांधी चौक असा एकमेव मुख्य रस्ता आहे, तो पण अरुंद ! शहरातील अरूंद असा हाच आपला रिंग रोड समजुन इथले नागरिक भाबडा अभिमान बाळगतात हा त्यांचा मोठेपणा आहे. आराध्य दैवत माता महाकाली मंदिर व गोंडकालिन वास्तुमुळे या शहराला आगळे-वेगळे महत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेल्या या गोंडकालिन शहराची मुक्त कंठाने प्रशंसा केली होती, हे येथे विशेष सांगावेसे वाटते. शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी घरपोच मिळावे यासाठी स्वच्छतेचे पुरस्कार (?) प्राप्त चंद्रपूर शहर महानगर पालिकेने याठिकाणी काही वर्षापुर्वी गाजतवाजत 'अमृत योजना' सुरू केली होती. मुख्य पाईप लाईनपासुन घरोघरी पाणी पोहोचविणारी ही योजना सुरू करण्यात आली, या योजनेतंर्गत (अपुरे पाणी असलेली व नसलेली) पाईप लाईन तर घरापर्यंत पोहोचवली परंतु मुख्य रस्त्यापासून गल्लीबोळापर्यंत खोदण्यात आलेले खड्डे बुजविण्यात मात्र पुर्ण बिल घेवुन मोकळे झालेले कंत्राटदार विसरले. आता शासकीय विभागाच्या आपसी समन्वयाच्या अभावाने ही योजना अपुर्ण राहिली असे सांगत पुन्हा 'अमृत योजना-२' चा शहरात थाटाने प्रारंभ करण्यात आला यासाठी पुन्हा एकदा मुख्य रस्त्यावर खड्डे खोदण्याचे महत्कार्य सुरू झाले आहे.
चंद्रपूर च्या रस्त्याची दुर्दशा !
गांधी चौकातुन जटपुरा गेटपर्यंतचा प्रवास करतांना चौकापासून १० फुटावर मुख्य रस्त्यावर मधोमध रोड खोदून एक खड्डा पार करत नाही तोच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दुसरा खड्याचा सामना वाहन धारकांचे स्वागतासाठी तयार असतो. त्यापुढे आदर्श रेडीमेड समोर, बँक ऑफ इंडिया समोर मुख्य रस्त्यावरील खड्याचा त्यांना सामना करावा लागतो, लगेच जयंत टॉकीज परिसरात पुन्हा एक खड्डा त्यांचे आवासून वाट पाहत असतोच समोर गेल्यानंतर १०- १५ फुटानंतर पुन्हा एकदा शासकीय रुग्णालयासमोर असलेला खड्डा कसा बसा पार गेल्यानंतर पुन्हा जटपुरा गेट पावेतो २-३ खड्डे वाहन धारकांची वाट बघतच असतात. अरूंद रस्त्यावरील चारचाकी- दुचाकी वाहन धारकांमधुन कशीबशी वाट काढीत गोंडकालिन आलिशान जटपुरा गेट नजरेस पडतो, त्यानंतर बस स्टैंड कडे जाणाऱ्या रस्त्यावर गांधीजीच्या पुतळ्यापासून पुन्हा समोर अर्धा किलोमिटर खड्यांचे सौंदर्यीकरणातुन खडतर प्रवास सुरू होतो. वाहन धारकांना या संकटापासून शेवटपर्यंत महानगर पालिकेच्या मेहरबानीने सुटका मात्र होत नाही. बरं तिथुन परत येतांना पुन्हा गांधी चौकापर्यंत यायचे म्हटले तर त्यापेक्षा ही कठीण प्रवास सुरू होतो. जनार्दन मेडिकल पासून बिकट वाट काढीत निघाले तर वसंत भवन पासचा खड्डयाचे आवाहन पेरल्यानंतर बेंगलोर बेकरी पाशी जिवघेणा खड्डा पुन्हा वाहनधारकांच्या प्रतिक्षेत मिळतो, त्यानंतर ज्युबिली शाळा जवळील बिकट वाट पार केल्यानंतर त्यापासून १५-२० फुटावर पुन्हा माता वासवी माता चौक (होटल प्रिन्स) येथुन तर कसरतीची पुर्ण वाट लागते. 'गेला रस्ता कुणीकडे, खड्डेच खड्डे चहुकडे गं बाई....!' असे म्हणत वाहनधारक प्रशासनाच्या व लोक (?)प्रतिनिधींच्या नावाने बोटे मोडीत कसेबसे आपले निवासस्थान, कार्यालयात पोहोचल्यावर सुटकेचा श्वास घेतात.
बरे...! १५ फुटांच्या रस्त्यांना दोन भागात विभागल्याच्या थाटात रोड फोडून ठेवण्यात आले आहे, हे विशेष! त्यातचं हे खड्डे बुजविण्यासाठी म्हणावे की कशासाठी या खड्यांमध्ये काळ्या गिट्टीची चुरी टाकण्यात आली आहे, त्यामुळे खड्यांपासून वाहनधारक निसटला तरी रस्त्यांवर पसरलेल्या या चुरीमुळे वाहनांचा अपघात मात्र होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु या कोणत्याही गंभीर गोष्टीची चिंता प्रशासन प्रतिनिधी यांना असल्याचे जाणवत नाही. याविरोधात समाजसेवकांनी केलेले आंदोलनाकडे ही संबंधित प्रशासनाने जाणिवपुर्वक पाठ फिरविली असे सध्याचे चंद्रपूर शहराचे चित्र आहे. मुघलांनी गाडून ठेवलेला धनाला शोधण्यासाठी तर गोंडकालिन चंद्रपूर शहरामध्ये खोदकाम सुरू नाही नां? अशी उपहासात्मक टिका आता चंद्रपुरकर करू लागले आहेत. चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली या निर्बुद्धांना दुर्घटनेपूर्वी हे रस्ते त्वरित पुर्ववत करण्याची सदबुद्धी देवो, हेच या निमीत्ताने सांगावेसे वाटते.
0 टिप्पण्या